पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६७०
 

आहे. आपण अत्यंत आळशी व मूर्ख झालो आहो. हे सर्व दोष नष्ट करून आपल्या प्राचीन धर्माचे पुनरुज्जीवन धर्ममहामंडळाने केले पाहिजे. त्या धर्माची तच्चे किती उज्ज्वल होती हे, ऑलिव्हर लॉज, मेयर यांसारखे शास्त्रज्ञ आज सांगत आहेत. हे ध्यानी घेऊन आपण आपल्या प्राचीन धर्माचे नव्याने संपादन केले पाहिजे आणि विज्ञानाच्या नव्या प्रकाशात त्याची मांडणी केली पाहिजे.'
 लो. टिळकांच्यानंतर महात्माजींचे आगमन झाले. विवेकानंद, टिळक यांच्या प्रमाणेच ते अखिल भारताचे गुरू होते. तेव्हा त्यांच्या धर्मविचारांची छाप मराठी मनावर बसावी, यात नवल असे काहीच नाही.
 महात्माजींच्या धर्मतत्त्वांचा विचार करताना सत्य, अहिंसा, आतला आवाज याला नेहमी महत्त्व दिले जाते. आणि ते योग्यच आहे. पण या बाबतीत त्यांची काही मते एकांतिक असली, तरी ज्या धर्मक्रांतीचा विचार आपण करीत आहो, ब्रिटिशकालातील ज्या धार्मिक परिवर्तनाचा मागोवा घेत आहो, त्या दृष्टीने पाहिले तर वरील दोन महापुरुषांच्या मतांहून महात्माजींची मते फारशी निराळी होती, असे दिसत नाही.

परमेश्वर दलितांमध्ये
 परमेश्वराचा साक्षात्कार हे धर्माचे अंतिम उद्दिष्ट असले, तरी तो परमेश्वर दीन- दलितांच्या ठायी असतो आणि त्यांची सेवा हीच परमेश्वराची खरी सेवा, असे ते सांगत. ते म्हणत, 'हिमालयाच्या गुहेत देव आहे असे मला कळले तर मी तेथे जाईन. पण तो तेथे नाही. मानवाच्या ठायीच तो असतो. म्हणून आपल्या बांधवांची सेवा हाच खरा धर्म होय.'
 देव, अध्यात्म यांचे महत्त्व महात्माजी नाकारीत नाहीत. पण, 'भुकेल्या, दीन- दरिद्री कोट्यवधी जनतेला अध्यात्म सांगणे हे व्यर्थ आहे. त्यांना प्रथम काम देऊन भाकरी मिळवून देणे हेच माझे पहिले कर्तव्य होय. भरल्या पोटी वेदान्त सांगणे मोठे सुखाचे असते. पण ते सांगणाऱ्याला ! भुकेल्यांना भाकरी हाच परमेश्वर होय.'

राजकारण-धर्म
 'मी सत्याचा शोध घेणारा एक नम्र पाईक आहे. सामाजिक, आर्थिक, नैतिक, राजकीय सर्व क्षेत्रांत मी काम करतो तो या शोधासाठीच. माझे राजकारण यासाठीच आहे. येथे कोट्यवधी लोक गुलामगिरीत खितपत पडले आहेत. राजकारणात पडल्यावाचून त्यांची सेवा करणेच शक्य नाही. म्हणून माझे राजकारण ही मानवसेवाच आहे. म्हणजेच तो सत्याचा शोध आहे.'
 धर्मावाचून राजकारणाचा विचार करताच येत नाही, असे आत्मचरित्रात महात्माजींनी लिहिले आहे. तसे तुम्हांला अजूनही वाटते का, असे कोणी विचारल्यावरून ते म्हणाले, 'निश्चित वाटते. धर्मापासून अलग असा राजकारणाचा मी विचारच