पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६९
धर्मक्रांती
 

नाही, तेव्हा या चळवळीत भगवंताचे अधिष्ठान नाही, हे तर कारण नसेल ना !' असे त्यांच्या एक-दोन मित्रांनी विचारले. तेव्हा लोकमान्य म्हणाले, 'चळवळीच्या कचेरीत एखादी मूर्ती बसविली म्हणजे भगवंताचे अधिष्ठान होते असे नाही. आमची होमरूलची चळवळ ही हिंदुस्थानची भूमी परकीय जुलमातून सोडविण्यासाठी व सनातन धर्म रक्षिण्यासाठी आहे. म्हणून तीत भगवंताचे अधिष्ठान आहेच आहे. ही चळवळ म्हणजे परमेश्वराची आराधनाच आहे. ईश्वरचिंतनात असताना जे सुख, जी शांती मिळते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला या चळवळीत घ्यावयास सापडतो.' पंढरपूरच्या वारकऱ्यांना 'तुम्ही राष्ट्रोन्नतिरूप मोक्ष मिळवा' असा उपदेश करीत. कोणत्याही धर्मकृत्याचे, लोकांचे दुःख अल्पांशाने तरी दूर करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे, असा टिळकांचा आग्रह असे. साखरेबुवांना ते एकदा म्हणाले, 'तुम्ही आपल्या प्रवचनात ब्रहा सत्य जगन्मिथ्या, अशी नुसती बडबड केल्याने, पारतंत्र्याच्या दुःखात होरपळत असलेल्या हिंदुस्थानातील लोकांस त्यापासून यत् किंचित तरी गारवा येईल का ?'

बुद्धीला आवाहन
 टिळकांना कोणते धार्मिक परिवर्तन, धार्मिक पुनरुज्जीवन अपेक्षित होते, ते यावरून कळून येईल. राष्ट्रधर्म हाच त्यांचा खरा कर्मयोग होता. आणि त्याचीच प्रवचने सर्वांनी करावी, असे ते सांगत असत. मात्र ही धर्मप्रवचने नव्या, शास्त्रीय, पाश्चात्य पद्धतीने झाली पाहिजेत, असे त्यांचे कटाक्षाने सांगणे असे. जुनी पद्धत केवळ सिद्धांतच सांगण्याची आज्ञा करण्याची होती. गीतारहस्याच्या उपसंहारात त्यांनी म्हटले आहे की 'मन्वादी स्मृतींतून, उपनिषदांतून, सत्य, अहिंसा याविषयीच्या आज्ञा स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत. पण मनुष्य हा ज्ञानवान प्राणी असल्यामुळे, वरच्यासारख्या नुसत्या विधानांनी त्याचे समाधान न होता, हे नियम घालून देण्याचे कारण काय, हे समजून घेण्याची त्याची स्वभावतःच इच्छा असते.' शिकलेल्या लोकांपुढे पाश्चात्य पद्धतीने धर्माचे विवेचन करून आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या बुद्धीला पटवून दिले पाहिजे, असे त्यांनी पुनः पुन्हा सांगितले. जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जागी हल्लीच्या काळी इंग्रजी शिकलेला मनुष्य आला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता, तो यासाठीच.

नवी मांडणी
 १९०६ साली भारत धर्ममहामंडळापुढे त्यांचे जे व्याख्यान झाले, त्यात त्यांच्या सर्वधर्मविचारांचा भावार्थ आला आहे. ते म्हणतात, 'भारत धर्ममहामंडळ हे नाव केव्हा सार्थ होईल ? हिंदुधर्मातील सर्व शाखा, पंथोपपंथ यांचे दृढ ऐक्य मंडळ करील तेव्हा. धर्माची व्याख्याच मुळी, धारण करणारा तो धर्म, अशी आहे. सध्या आपल्या धर्माला वाईट कळा आली आहे. दुही, फूट, भेद, विभक्तता यांनी आपल्याला ग्रासले