पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६६८
 

तितकाच समर्थ पुरुष हवा होता. तो टिळकांच्या रूपाने अवतरला. गीतेतले प्रतिपादन सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी सर्व पाश्चात्य तत्त्ववेत्यांचे आलोडन करून जो मोठा ग्रंथ लिहिला त्याला तोड नाही. समर्थ, शिवछत्रपती यांना जे सांगावयाचे होते तेच टिळकांनी सांगितले. 'देश आणि देव हे दोन मानणारे जे लोक आहेत, ते सर्व प्रकारचे धर्मभ्रष्ट आहेत, असे मी समजतो,' असे ते म्हणत. समर्थांच्या प्रतिपादनाचे विवेचन करताता त्यांनी हे जास्त स्पष्ट केले आहे. 'घराचे दार बंद करून उपासना केली की संपले, घराबाहेर कोणाचेही राज्य असो, बाहेर वाटेल त्या आपत्ती येवोत त्यांचा धर्माशी काही संबंध नाही, असा एक पूर्वी समज होता. पण रामदासांनी हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन केले. या धर्मात असे तत्त्व आहे की ज्याला मोक्षप्राप्ती पाहिजे असेल त्यास, आपल्या देशबांधवांची काळजी घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. जे आपल्या देशाकडे पाहात नाहीत, ' रंजले गांजले' यांना आपले म्हणत नाहीत, आपले हजारो देशबांधव विपत्तीत असताना, जे नाक वरून घरात बसतात, ते ढोंगी आहेत, अशा प्रकारची बुद्धी लोकांत उत्पन्न करणे, म्हणजे राष्ट्र जिवंत करणे आहे.'

देशसेवा
 देश, जनता यांची सेवा हा जसा धर्म, तसाच राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय जागृती हाही ते धर्म मानीत. एके ठिकाणी ते म्हणतात, 'उच्च कल्पना, अत्युच्च कल्पना लोकांस शिकवून जातीजातींतील भेद नाहीसे करून, आपण सारे एक आहो, असे वाटावयास लावणे, हे खरे धर्मशिक्षण होय. इंग्रजी तत्त्ववेत्त्यांनी ही तत्त्वे सांगितली आहेत; आणि ती आपल्या उपयोगाची आहेत. ही तत्त्वे पूर्वी आपल्यात होती. पण ती आपण विसरलो आहो.'

समता
 टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सव सुरू केले ते राष्ट्रीय ऐक्य या धर्मासाठीच. गणेशोत्सवात साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार या सर्व जाती एकत्र मिसळतात, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तेच शिवाजी उत्सवाविषयी. 'शिवाजी महाराजांनी मराठे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी असा भेद न करता सर्वास एकराष्ट्रीयत्वाच्या जाळ्यात आणले. त्यामुळे त्यांचे स्मरण सर्वास विशेष श्रेयस्कर होईल यात शंका नाही.'

होमरूल - धर्म
 राष्ट्रीय चळवळीचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय ऐक्य हेच होय. म्हणून ती चळवळ हाच खरा धर्म होय, असे त्यांनी सांगितले आहे. 'बरीच वर्षे चळवळ करूनही यश येत