पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६७
धर्मक्रांती
 

चालेल. कारण नास्तिक मनुष्य हा खरा जिवंत मनुष्य असतो. निरीश्वरवादात एक प्रकारचे सामर्थ्य आहे. अंधश्रद्धा हा मात्र मृत्यू आहे. म्हणून कुजट रूढींच्या समर्थनापेक्षा नास्तिकतेनेच राष्ट्र वर येण्याचा जास्त संभव आहे.'
 त्यांच्या सर्व प्रतिपादनाचे तात्पर्य त्यांच्या पुढील उद्गारांवरून ध्यानात येईल. 'आम्ही हिंदुस्थानातील संन्याशांनी गरिबांसाठी काय केले ? आम्ही त्यांना अध्यात्म शिकविले ! भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणे ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे. आज लक्षावधी लोक अनान्न करीत आहेत. ही जनता हा परमेश्वर नव्हे काय ? भारताचे भवितव्य या जनतेवर अवलंबून आहे. तिला समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश दिला पाहिजे. असे करताना आपण कट्टरांतले कट्टर पाश्चिमात्य झाले पाहिजे. मात्र त्याच वेळी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या श्रेष्ठ धर्माचा आपणांस कधीही विसर पडता कामा नये.' धर्मक्रांतीचे स्वरूप यावरून स्पष्ट होईल.

बुद्धिवादाचे जनक
 महाराष्ट्रात आगरकरांचे समाजसुधारणेच्या क्षेत्रातले स्थान अनन्यसाधारण असे आहे. ते बुद्धिवादाचे निःसीम पुरस्कर्ते होते. रानडे, भांडारकर इ. पंडित धर्मसुधारणेसाठी जुन्या वचनांचा आधार घेत. अशा रीतीने एका ऋषीविरुद्ध दुसरा ऋषी उभा करणे, हे आगरकरांना मान्य नव्हते. आजच्या इहवादाचा सर्व भावार्थ त्यांनी आपल्या प्रतिपादनात सांगितला होता. त्यामुळेच त्यांना, 'बुद्धिवादाचे जनक' असे सार्थतेने म्हणता येते. 'मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन' हाच भावी काळात सार्वत्रिक धर्म व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. हा विचार जुन्या परंपरेच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचप्रमाणे विषयसुखाचे त्यांनी जे महत्त्व वर्णिले आहे तेही जुन्या परंपरेत मुळीच बसत नाही. विषयसुखाची निंदा हेच जणू प्राचीन काळच्या सर्व धर्मवेत्त्यांचे प्रमुख तत्त्व होते. आगरकरांनी त्याला अत्यंत जोराने धक्का दिला. असा मनुष्य पूर्णपणे प्रवृत्तिवादी असेल यात कसलीच शंका नाही.
 आगरकरांनी 'हे परम अमंगल अशा हिंदुधर्मा' अशी हिंदुधर्मावर टीका केली आहे; पण कर्मकांडात्मक विकृत धर्मावर, ध्येयवाद, सदाचार, नीतिनिष्ठा, लोकसेवा, सत्यनिष्ठा- ज्यामुळे समाजाचे धारण होते- तो धर्म, हे त्यांना पूर्णपणे मान्य होते. आणि तसे त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलेही आहे.

कर्मयोग
 अर्वाचीन कालातील महाराष्ट्रातील व भारतातील सर्वश्रेष्ठ धर्मसुधारक म्हणजे लो. टिळक हे होत. त्यांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथ आणि त्यातील कर्मयोगाचे प्रतिपादन यामुळे जे धर्मपरिवर्तन झाले ते दुसऱ्या कशानेही झाले नसते. हजारबाराशे वर्षे शंकराचार्यांच्या संन्यासवादाची जी पकड हिंदुमनावर बसली होती ती तोडून टाकण्यास