पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६६६
 

घेऊन धर्मसुधारणेला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतल्यामुळे, आणि ते प्राचीन ऋषिमुनींच्या भाषेत बोलत असल्यामुळे हा आपला माणूस आहे, अशी हिंदू लोकांची मनोमन खात्री झाली आणि मग त्यांनी केलेली टीका ते आनंदाने ऐकण्यास तयार झाले.

आत्मनिरीक्षण
 स्वामींनी हा विषय मोठ्या कौशल्याने हाताळला. त्यांच्या 'कोलंबो अल्मोरा व्याख्यानमालेवरून हे दिसून येईल. प्रारंभी प्राचीन परंपरेची, उपनिषद्धर्माची मुक्तकंठाने स्तुती करून नंतर ते भौतिक विद्येकडे वळले आणि आपण जगाचे गुरू आहाेत, हा वृथाभिमान आपण बाळगू नये, आपल्यालाही पाश्चात्यांकडून शिकण्यासारखे पुष्कळ आहे, असे सांगण्यास त्यानी प्रारंभ केला.
 ते म्हणत, भौतिक ज्ञान, संघटनकौशल्य, सत्ता खेळविण्याचे सामर्थ्य हे गुण आपण पाश्चात्यांकडून घेतले पाहिजेत. असा प्रारंभ करून स्वामीजींनी आपल्या गेल्या हजार वर्षांच्या अधःपाताचे चित्र श्रोत्यांपुढे उभे केले. 'आमच्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले, ख्रिस्त्यांचे झाले, आमच्यापैकी कोट्यवधी लोक धर्मच्युत झाले. पण आम्ही यावर काय उपाययोजना केली ? आमच्यांत जे दीनदलित होते त्यांना आम्ही निवृत्तीचे धडे देत बसलो. आमच्या पंडितांनी सगळा धर्म सोवळ्याओवळ्यात आणून ठेवला आणि ऐहिक वैभवाकडे दुर्लक्ष केले. त्याचे हे परिणाम आहेत. येथे पाश्चात्यांकडून भौतिकवाद आला आहे. त्याने आपला उद्धारच होईल. त्याच्यामुळे जन्मनिष्ठ उच्च- नीचता नष्ट होईल, बुद्धिप्रामाण्य निर्माण होऊन धर्मग्रंथांची ठेव सर्वांच्या हाती येईल व सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले होतील. पश्चिम ही धनिकांच्या टाचेखाली चेंगरली असली तर पूर्व ही धर्ममार्तंडांच्या टाचेखाली चिरडली आहे, हे ध्यानात ठेवा. आता एकीने दुसरीवर नियंत्रण ठेवून समतोल राखला पाहिजे. केवळ अध्यात्माने जगाची प्रगती होणार नाही.'
 हे एका हिंदू संन्याशाचे उद्गार आहेत, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. स्वामी भौतिकवादी, जडवादी कधीच नव्हते. पण भौतिकवादाचे, ऐहिक वैभवाचे स्वराज्य- स्वातंत्र्य याचे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणले होते. आधीच्या सुधारकांनी सांगितलेल्या सर्व सुधारणा त्यांना मान्य होत्या. ते म्हणतात, 'सुधारकांनाही झेपणार नाही इतकी सुधारणा व्हावी, अशा मताचा मी आहे. पण स्वकीयांचा तेजोभंग करून काही साधणार नाही. सुधारकांच्या अपयशाचे हे कारण आहे. त्यांनी अतिरिक्त आत्मनिर्भत्सना केली. अशा तेजोभंगाने कार्यभाग होत नसतो.'
 त्या काळी आपल्या जुन्या रूढी, लोकभ्रम, कर्मकांड यांचे, नव्या शास्त्रीय ज्ञानातील कोठला तरी सिद्धांत घेऊन, समर्थन करण्याची चाल थोडी सुरू झाली होती. या प्रकाराची स्वामींना अत्यंत चीड असे. ते म्हणतात, 'या प्रकारे जुन्या रूढींचे समर्थन करणे हे अत्यंत लजास्पद आहे. असे भोळसट होण्यापेक्षा तुम्ही नास्तिक झाला तरी