पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६५
धर्मक्रांती
 

तेरा वर्षीच्या एका मुलाला, 'जगद्गुरूचा अवतार' असे मानून, त्याचा संभाळ केला व शिक्षण केले. सध्याचे जे. कृष्णमूर्ती ते हेच होत. ते आता थिऑसफीतून बाहेर पडले आहेत आणि, ज्याचा त्याने स्वतंत्र विचार करावा, असे सांगतात. थिऑसफीला जसे सुशिक्षित वर्गात अनेक निष्ठावंत अनुयायी मिळाले, तसे कृष्णमूर्तीनांही मिळाले आहेत. पण एवढे खरे आहे की काही मर्यादित सुशिक्षित वर्गापलीकडे या दोन्ही पंथांचा प्रसार महाराष्ट्रात केव्हाच झाला नाही.
 बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, प्रार्थनासमाजातील रानडे, भांडारकर, सत्यशोधक म. फुले या सर्वांना हिंदुधर्माचे पुनरुज्जीवनच करावयाचे होते. पण त्यांपैकी बरेचसे पुरुष सरकारी नोकर होते. इंग्रजांचे राज्य हे दैवी वरदान असे ते मानीत असत. ख्रिश्चन धर्म अनेक कृष्णकारस्थाने करीत असूनही ते त्यांचा गौरव करीत असत. यामुळे सर्व भारतात नवचैतन्याची लाट निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले नाही. ते कार्य केले ते स्वामी विवेकानंदांनी. भरतभूमीच्या सुदैवाने हा महापुरुष त्या वेळी उदयाला आला आणि चित्कलेचा स्पर्श व्हावा तसा प्रकार होऊन सर्व भारतात नवचैतन्य निर्माण झाले व त्याची कोमेजलेली अस्मिता पुन्हा प्रफुल्ल झाली.

नवचैतन्य
 ब्रिटिशांनी हिंदी लोकांना रणात पराभूत केले होते. त्यांच्या विज्ञानामुळे हिंदी लोक दिपून गेले होते. ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्माची सारखी निंदा करीत होते. पाश्चात्य विद्येच्या अभ्यासामुळे आपल्या धर्मातील, समाजातील व एकंदर जीवनातील अनेक उणिवा त्यांना स्वतःलाच दिसू लागल्या होत्या. या सर्वांमुळे आपण, आपला समाज, आपला धर्म, हीन आहे, आपण हीन पातळीवरचे लोक आहोत, असा एक न्यूनगंड त्यांच्या ठायी निर्माण झाला होता. पण १८९३ साली शिकागो येथील सर्व-धर्मपरिषदेत भाषण करून, स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म हा सर्व जगातील धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे, असे सिद्ध केले आणि पाश्चात्य विद्वानही, त्यांना परमेश्वरी अवतार मानून, त्यांचे शिष्यत्व पत्करण्यास सिद्ध झाले, तेव्हा हिंदी लोकांच्या मनावर आलेले मालिन्य क्षणार्धात नष्ट झाले, त्यांचा न्यूनगंड नाहीसा झाला आणि त्यांच्या मनाला नवा जोम प्राप्त झाला. सर्व हिंदुस्थानवर त्याचा परिणाम झाला, तसा महाराष्ट्रावरही झाला; आणि येथील आधीच्या धर्मसुधारणांना तितकेसे महत्त्व राहिले नाही.

आपला माणूस
 स्वामी विवेकानंद केवळ अध्यात्मवादी नव्हते. ते प्राचीन परंपरेचे अंध भक्त नव्हते. भौतिक विद्येचे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणले होते. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील अनंत उणीवांचीही त्यांना जाणीव होती. पण शिकागो येथील भाषणामुळे, संन्यास