पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६६४
 

कधीच उत्तर दिले नाही. ब्राह्मो समाजाचे केशवचंद्रसेन हे तर संपूर्णपणे ख्रिस्तमय होऊन गेले होते. जोतिबांनी तर, महाराष्ट्रात प्रत्येक खेड्यात दोन मिशनरी ठेवावे, अशी इंग्रज सरकारला सूचना केली होती. या सर्वांमुळे हे लोक हिंदी समाजाला परके वाटत. याची प्रतिक्रिया म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी ही होय. ख्रिश्चन धर्मातील व्यंगे शोधून काढून, त्यावर ते कडाडून हल्ला चढवीत. त्यामुळे मुंबईच्या चौपाटीवर त्यांच्या सभा फार गाजत व ख्रिश्रनांच्या धर्मप्रसाराला तोडीस तोड मिळे. पण असे असले तरी विष्णुबुवांचा स्वधर्माभिमान आंधळा नव्हता. जन्मनिष्ठ जातिभेद व वर्णभेद त्यांना मान्य नव्हते. मनुष्य वयात आल्यावर त्याचे गुण पाहून त्याप्रमाणे त्याचा वर्ण ठरवावा व लग्ने त्या वर्णाप्रमाणे व्हावी, असे ते सांगत असत. दुसरा एक त्या काळच्या दृष्टीने अत्यंत आश्चर्यकारक असा विचार त्यांनी आपल्या 'सुखदायक राज्यप्रकरणी' या पुस्तकात सांगितला आहे. 'सर्व प्रजेने सर्व क्षेत्रांत कष्ट करावे आणि जे अन्नधान्य, कपडे निर्माण होतील ते राजाने एका कोठारात साठवून ठेवावे व तेथून ज्याला जो लागेल तो माल प्रत्येकाने न्यावा, सोन्यामोत्यांच्या दागिन्यांची सुद्धा अशीच व्यवस्था असावी.' हा अगदी अस्सल मार्क्सवादी विचार आहे. तो या संन्याशाने मार्क्सचा काडीमात्र अभ्यास नसताना येथे सांगितला होता, हे मोठे विस्मयजनक आहे. विष्णुबुवांच्या कोणत्याच विचाराचा समाजांत प्रसार झाला नाही, हे खरे. पण अगदी सनातनी म्हणविणाऱ्या मनातसुद्धा त्या वेळी धर्मक्रांती झाली होती. हे त्यांच्या उदाहरणावरून दिसून येईल.

थिऑसफी
 'थिऑसफी' या धर्मपंथाचाही विचार जाता जाता केला पाहिजे. मॅडम ब्लॉव्हाट्स्की या रशियन बाईने १८७५ मध्ये अमेरिकेत 'थिऑसफी' पंथाची स्थापना केली आणि कर्नल ॲल्काट यांनी १८७९ साली हिंदुस्थानात येऊन मुंबईला पहिली 'थिऑसफिकल सोसायटी' स्थापन केली. या संस्थेत प्रमुख मंडळी महाराष्ट्रीय होती. श्री. मावळंकर, लोकहितवादी, डॉ. कुंटे, डॉ. भाटवडेकर, न्या. मू. गाडगीळ इ. प्रतिष्ठित लोक प्रारंभीच संस्थेला मिळाले. १८८२ साली मद्रासजवळ अड्यार येथे या संस्थेचे कार्यालय नेण्यात आले.
 थिऑसफीची मूलतत्त्वे हिंदुधर्मासारखीच आहेत. परब्रह्म, आत्म्याचे अमरत्व, पुनर्जन्म, हे सर्व थिऑसफीला मान्य आहे. कर्मविपाकाचे तत्त्वही मान्य आहे. त्याचबरोबर विश्वबंधुत्वाचा प्रसार हे व्यापक अधिष्ठान संस्थेला असल्यामुळे हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, फारशी, बौद्ध अशा सर्व धर्मीयांचा समावेश या पंथात होतो.
 थिऑसफीला भारतात विशेष उजळा मिळाला तो डॉ. ॲनी बेझंट या बाईंच्यामुळे. 'भरतभूमी ही माझी खरी मायभूमी' असे त्या मानीत. थोर महात्मे जगाला मार्गदर्शन करीत असतात, अशी थिऑसफिची श्रद्धा आहे. त्याच कारणामुळे बेझंटबाईंनी