पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६३
धर्मक्रांती
 


प्रार्थना समाज
 दादोबा पांडुरंग यांच्या प्रारंभीच्या दोन सभा अपयशी झाल्या तरी त्यांनी चिकाटी सोडली नाही. १८६७ साली 'प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली. तीत ते व त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर ही थोर मंडळी मागून येऊन त्यांस मिळाली. दादोबांनी सांगितलेलीच तत्त्वे बव्हंशी प्रार्थना समाजाला मान्य होती. परमेश्वर निर्गुण निराकार आहे, सत्य, सदाचार, भक्ती यांनीच तो प्रसन्न होतो, अशा तऱ्हेची विवेचने रानडे, भांडारकर यांनी केली आहेत. प्रार्थनासमाज निराकार परमेश्वराला भजत असला तरी तो समाज सभेत तुकारामाचे अभंग म्हणत असे. ब्रिटिश कालातील धर्मसुधारणांत प्रार्थनासमाजाला महत्त्वाचे स्थान आहे. पण ते, रानडे, भांडारकर, असे थोर पुरुष त्याला येऊन मिळाल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या तात्त्विक विवेचनामुळे प्राप्त झाले होते. एरवी प्रत्यक्षात काही वरिष्ठ सुशिक्षित वर्गापलीकडे त्याचा प्रसार झाला नाही आणि पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, मुंबई अशा शहरांपलीकडे तो गेला नाही.

सत्यशोधक समाज
 'प्रार्थना समाजा'चा जसा सुशिक्षित वर्गात प्रसार झाला तसा महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या (१८७३) 'सत्यशोधक समाजा'चा बहुजनसमाजात प्रसार झाला. ब्राहाणी वर्चस्व आणि कर्मकांडात्मक ब्राह्मणी धर्म यांवर बहुजन समाजातील धर्मसुधारकाने, इतका प्रखर हल्ला यापूर्वी कधी कोणी केला नव्हता. परमेश्वर आणि मनुष्य यांमध्ये भटजी हा जो दलाल त्याचा जोतिबांनी कडकडून निषेध केला आहे. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ॥ असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीच जोतिबांनी स्त्रिया व अस्पृश्य यांसाठी शाळा स्थापून समाजक्षेत्रात मोठी क्रांती केली होती. त्यामुळे त्यांना सर्वत्र मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्यामुळे आणि ब्राह्मण- विरोधामुळे सत्यशोधक समाजाचा प्रसार त्या वेळी वेगाने झाला.

प्रतिक्रिया
 याच सुमारास विष्णुबुवा ब्रहाचारी- गोखले- यांचा उदय झाला. हे ब्रह्मचारी संन्यासी असून त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला होता. प्राचीन परंपरा व वेद यांचा त्यांना कडवा अभिमान होता. लोकहितवादी, रानडे, भांडारकर यांना भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान नव्हता असे नाही. पण हे सर्व लोक इंग्रजांचे राज्य हे एक वरदान मानीत असत आणि त्यांच्या सभा, प्रार्थनापद्धती हे सर्व ख्रिस्ती वळणावर जात असे. प्रत्येक धर्मात काही तरी व्यंगे असतातच. पण ख्रिश्चन लोक हिंदुधर्मातील व्यंगावर बोट ठेवून त्याची निंदानालस्ती करीत. त्याला वरील लोकांनी