पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६१
धर्मक्रांती
 


परमहंस सभा
 बाळशास्त्री जांभेकर यांच्या नंतर धर्मसुधारणेचा प्रयत्न करणारे मोठे पंडित म्हणजे 'मराठीचे पाणिनी' म्हणून प्रसिद्ध असलेले दादोबा पांडुरंग हे होत. त्यांनी प्रथम सुरतेला १८४४ साली 'मानवधर्म सभा' नावाची संस्था स्थापन केली. ईश्वर एक असून तो निराकार आहे, नीतिपूर्वक ईश्वरभक्ती हाच खरा धर्म होय, नित्यनैमित्तिक कर्मे विवेकास अनुसरून करावी, सर्वांस ज्ञानशिक्षा असावी, प्रत्येक मनुष्यास विचार- स्वातंत्र्य आहे, अशी या सभेची मुख्य तत्त्वे होती. मूर्तिपूजा त्यांना वेडगळ वाटे व रविवारी एकत्र जमून ते ख्रिश्चन लोकांप्रमाणे निराकार परमेश्वराची प्रार्थना करीत. ही सभा फार दिवस टिकली नाही. तेव्हा १८४९ साली दादोबांनी 'परमहंस सभा' म्हणून दुसरी सभा स्थापन केली. हिची तत्त्वे पहिल्यासारखीच होती. शिवाय जातिभेद मोडण्याचे प्रत्यक्ष काम ते आरंभी करीत. म्हणजे प्रत्येक सभासदास ख्रिस्त्याच्या हातचा पाव, अस्पृश्याने शिजविलेले अन्न व मुसलमानाने आणलेले पाणी प्यावयास देत. हे स्वीकारल्यावाचून कोणासही सभासद होता येत नसे.
 त्या काळच्या मानाने पाहता हा विचार व ही कृती अत्यंत क्रांतिकारक होती. तीत वैगुण्य एवढेच की हे सर्व काम गुप्तपणे चाले. वास्तविक ज्याला समाजसुधारणा करावयाची आहे त्याने मोठ्या धैर्याने पुढे येऊन समाजाला नवी तत्त्वे सांगितली पाहिजेत आणि त्यांचे आचरण केले पाहिजे. पण हे धैर्य यांपैकी कोणाच्याही अंगी नव्हते. दादोबांनी या सभेसाठी 'पारमहंसिक ब्राह्मधर्म' असे नाव देऊन वीस ओव्यांची एक पोथी रचली होती.

विश्वकुटुंबी जो । सर्वादिकारण । बापा त्या शरण । जावे तुम्ही
बंधूच्या नात्याने । वागा मानवाशी । उदार मनासी । ठेवूनिया
भूतदयेने । करा देवपूजा । हीच अधोक्षजा । आवडते
करा किंवा टाका । बाह्य धर्म साेंग । ठेवा अंतरंग । शुद्धतरी
दया भक्तिशील । मनाचे मवाळ । करिली हळहळ । देशाचिया
म्हणोनिया दावा । सदाचरणास । ज्ञानाचा तो अंत । दादोबा म्हणे

 त्या त्यांच्या ओव्यांवरून 'सदाचार, शुद्ध अंतःकरण हाच खरा धर्म ', 'कर्मकांडाला महत्त्व नाही', 'भूतदया हीच देव पूजा', 'सर्व मानव एकच आहेत', स्वदेशसेवा ही धर्मसेवाच आहे, ही धर्मक्रांतीची सर्व तत्त्वे या पारमहंसिक ब्राह्मधर्मात होती, असे दिसून येईल. पण सर्व लोकांपुढे ती सांगण्याचे व आचरण्याचे धैर्य कोणातही नसल्याने, कोणी उपद्व्यापी पुरुषाने सभासदांची नावे प्रसिद्ध करताच सभेची वाताहात झाली. पण गुप्तपणे का होईना असले क्रांतिकारक विचार त्या वेळी काही लोकांच्या मनात आले व सभेत त्यांनी ते आचरले हेही कौतुकास्पद आहे.