पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५७
नव्या प्रेरणा
 

१८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय राजकारण एका विशिष्ट दिशेने चालू लागले. लवकरच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेसच्या शाखांची स्थापना झाली.

सामाजिक
 म. फुले यांनी स्थापिलेला 'सत्यशोधक समाज,' महर्षी शिंदे यांचे 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ,' प्रथम काँग्रेसची एक उपसंस्था म्हणून स्थापन झालेली 'सामाजिक परिषद' या समाजक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था होत. कामगार संघटना उभारण्याचे काम लोखंडे यांनी आणि शेतकरी संघटनेचे काम भालेकर यांनी सुरू केले. मुंबईला ट्रेड युनियन या संस्थेची बांधणी करण्याचे कार्य ना. म. जोशी, बॅ. बॅप्टिस्टा यांनी प्रारंभिले. मार्क्सवादी तत्त्वावर याच चळवळी डांगे, निमकर, जोगळेकर, इ. कम्युनिस्ट नेत्यांनी चालविल्या.
 १९१० मध्ये 'भारत इतिहास संशोधक मंडळा' ची स्थापना झाली. 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था' ही इतिहास संशोधक संस्थाच आहे. धुळे येथील 'राजवाडे संशोधन मंदिर' या संस्थेने महाराष्ट्र इतिहास संशोधनाचे कार्य पुढे चालविले आहे.

औद्योगिक
 औद्योगिक क्षेत्रात डोळ्यात भरण्याजोगे कार्य महाराष्ट्र करू शकला नाही. किर्लोस्कर, ओगले ही उदाहरणे अभिनंदनीय आहेत. पण ती त्या काळी अपवादात्मक होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांनी औद्योगिक क्षेत्रात संघटना निर्माण करण्याचे प्रयत्न नेटाने चालविले आहेत. सहकारी साखर कारखान्यांचा विशेष अभिमानाने उल्लेख केला पाहिजे. कारण महाराष्ट्राला जी काही थोडी समृद्धी लाभली आहे ती त्यांच्यामुळेच लाभली आहे.

नावीन्य
 वरील संस्थांचे नुसते रूप डोळ्यांपुढे आणले तरी मागल्या काळच्या संस्थाहून या अगदी निराळ्या आहेत हे ध्यानात येईल. ग्रामस्थ म्हणून किंवा जात म्हणून या संस्थांत कोणी आलेले नाही. काही उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून नेत्यांनी संस्था काढल्या आणि ते ज्यांना पटले, मानवले त्या त्या व्यक्ती त्या संस्थांना जाऊन मिळाल्या नवे जीवन ते हेच होय. सार्वजनिक, राष्ट्रीय कार्य असे मागे नव्हतेच. ते आता य. संस्था करू लागल्या. त्यांना जाऊन मिळण्याचे जसे स्वातंत्र्य प्रत्येकाला होते, तसे न मिळण्याचे किंवा मतभेद झाल्यास ती संस्था सोडण्याचे स्वातंत्र्यही होते. ग्रामसंस्थांत किंवा जातिसंस्थांत असले स्वातंत्र्य कोणालाच नव्हते.
 यावरून हे स्पष्ट होते की मानवाकडे मानव म्हणून आता समाज पाहू लागला.
 ४२