पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६५८
 

हेच पूर्वी नव्हते. माणसाची ओळख जातीवरून व्हावयाची आणि जात म्हटली की अनेक कर्मकांडे व अनेक अर्थशून्य बंधने यांनी तो मनुष्य जखडलेला असे. म्हणजे तो एकपरी गुलामच होता. आता ती गुलामगिरी संपली. आता मानवाला महत्त्वाची प्रतिष्ठा आली. त्याच्या मनाला, बुद्धीला, प्रजेला स्वातंत्र्य आले, त्यांच्या विकासाला संधी मिळाली आणि तसा विकास झाल्यामुळेच येथे शंभर वर्षांत क्रांती होऊ शकली.

ऐहिक आकांक्षा
 वरील संस्था पहिल्या म्हणजे भारतीयांच्या आणि त्याप्रमाणेच महाराष्ट्रीयांच्या ऐहिक आकांक्षा आता जागृत झाल्या होत्या हे स्पष्ट दिसते. निवृत्तिवाद, आचार्य, संत यांनी केलेली संसारनिंदा, मायावाद, कर्मविपाकवाद यामुळे या भूमीत ऐहिक वैभवाच्या, श्रीसमृद्धीच्या सर्व आकांक्षाच नष्ट झाल्या होत्या. परकीयांनी सर्व हिंदुस्थान जिंकला तो बहुतेक हिंदू सेनापती आणि हिंदू लष्कर यांच्या साह्यानेच जिंकला. हे कशाचे द्योतक आहे ? स्वराज्य, वैभव, सत्ता, समृद्धी, दिग्विजय यांच्या आकांक्षाच येथील लोकांच्या मनात नव्हत्या. किंवा असल्या तर त्या अत्यंत क्षीण अशा होत्या. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' अशी येथल्या समाजाची वृत्ती झाली होती. पाश्चात्य विद्येमुळे ती पालटली व ऐहिक पराक्रमाची प्रेरणा हिंदी लोकांच्या ठायी निर्माण झाली. स्वातंत्र्यासाठी पुढे त्यांनी मरणमारणाचे संग्राम केले ते या प्रेरणेमुळेच.
 ब्रिटिश कालाच्या शंभर सवाशे वर्षात महाराष्ट्रीय संस्कृतीत कोणते परिवर्तन झाले त्याचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. धर्म, समाजकारण, विज्ञान, अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांचा विचार त्यात होईलच. पण या परिवर्तनामागे कोणत्या प्रबळ प्रेरणा होत्या पहाणे अवश्य वाटल्यावरून त्यांचे विवेचन प्रथम केले. आता वरील अंगांचा तपशिलाने विचार करणे सुलभ होईल.