पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६५६
 

 पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होऊ लागताच या सर्व जाणिवा येथल्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींना झाल्या आणि त्यांनी या देशात धर्म, राजकारण, शिक्षण, संशोधन, व्यापार, उद्योग इ. सर्व क्षेत्रांत अनेकविध संस्था निर्माण केल्या. या संस्थांच्या पसाऱ्याची काहीशी कल्पना देऊन हे प्रकरण पुरे करू. प्रत्येक क्षेत्रातल्या त्यांच्या सांस्कृतिक कार्याचे विवेचन पुढे स्वतंत्रपणे करावयाचे आहेच.

धर्मसंस्था
 धर्मक्षेत्रात नवीन धर्मकल्पनांचा प्रसार करण्यासाठी दादोबा पांडुरंग यांनी प्रथम 'मानवधर्मसभा' आणि नंतर 'परमहंससभा' अशा संस्था स्थापन केल्या. नंतर आत्माराम पांडुरंग, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर यांच्या पुरस्काराने 'प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली. प्रार्थना समाजाचे वळण काहीसे ख्रिश्चनधर्मीय होते. त्याच्या प्रतिकारार्थ स्वामी दयानंद यांनी मुंबईस 'आर्यसमाजा'ची स्थापना केली. त्याचा प्रसार मात्र प्रामुख्याने पंजाबात झाला. अलीकडच्या काळात म. म. काणे, तर्कतीर्थ कोकजे यांनी लोणावळे येथे 'धर्मनिर्णय मंडळ' स्थापन करून हिंदू धर्मात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न केले. स्वामी केवलानंद यांनी वाईला 'प्राज्ञपाठशाला' याच हेतूने स्थापन केली.

शिक्षणसंस्था
 शिक्षणक्षेत्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अनेक शाळा काढल्या. सरकारनेही शाळा स्थापन केल्या होत्या. पण वर सांगितल्याप्रमाणे विशेष ध्येय डोळ्यांसमोर ठेवून म. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी व स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केल्या. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना झाली व न्यू इंग्लिश स्कूल, नू. म. विद्यालय, भावे स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, न्यू पूना कॉलेज अशा संस्था त्यांनी काढल्या व पुढे महाराष्ट्रभर त्यांच्या शाखांचे जाळे विणले. महर्षी कर्वे यांनी हिंगणे अनाथ बालिकाश्रम, नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, कन्याशाळा व रमाबाई रानडे यांनी सेवासदन अशा संस्था स्थापून स्त्रीशिक्षणाचा प्रश्न धसास लाविला. वरील संस्थांच्या अनुकरणानेच पुढे सर्व महाराष्ट्रभर अनेक शिक्षणसंस्था निघाल्या.

राजकीय
 पितामह दादाभाई, जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी या मंडळींनी १८५२ साली मुंबईला 'बॉम्बे असोसिएशन' ही संस्था स्थापन करून अर्वाचीन राजकारणाचा पाया घातला. पुढे सार्वजनिक काकांच्या साह्याने न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभा चालविली व शेतकऱ्यांत खेड्यापाड्यात हिंडून राजकीय जागृतीचा प्रारंभ केला.