पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५५
नव्या प्रेरणा
 

विचार आपण करीत आहो. पाश्चात्य विद्या हे त्याचे प्रधान कारण होय, हे आरंभी सांगितले. तीतूनच निर्माण झालेले बुद्धिप्रामाण्य हे दुसरे कारण होय. आणि यातूनच निर्माण झालेल्या भिन्नभिन्न क्षेत्रांतल्या अनेकविध संस्था हे तिसरे कारण होय. या तिसऱ्या कारणाचा म्हणजे महाराष्ट्रीयांच्या संस्थात्मक जीवनाचा आता विचार करावयाचा आहे.

संस्थात्मक जीवन
 राष्ट्र हे सामुदायिक जीवन आहे. आणि सामुदायिक जीवनाचे मुख्य लक्षण म्हणजे संस्था हे होय. अशा तऱ्हेच्या संस्था प्राचीन काळात येथे मुळीच नव्हत्या. येथे ग्रामसंस्था होत्या, जातिसंस्था होत्या आणि कुटुंबसंस्था होत्या. पण वर उल्लेखिलेल्या संस्थांप्रमाणे त्यांतली एकही संस्था नव्हती. ग्रामसंस्था आपल्या गावापुरत्या पाहात आणि तेही दुष्काळ, महापूर, दरोडे इ. आपत्तींच्या प्रसंगी. जातिसंस्था या आचारधर्माचा भंग, बहिष्कार याच उद्योगात मग्न असत. सर्व राष्ट्राचा उत्कर्ष लांबच राहिला, पण आपल्या जातीसंबंधीसुद्धा, तिची औद्योगिक उन्नती, तिचे शिक्षण, तिचे समाजजीवनातले स्थान याविषयीसुद्धा, जातीच्या पंचायती कधी विचार करीत नसत.

व्यक्ती अभाव
 ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी जवळजवळ हजार वर्षे सर्वत्र अशीच स्थिती होती. समाजाच्या भवितव्याची चिंता वहाणाऱ्या संस्था या देशात त्या काळात निर्माणच झाल्या नाहीत. कारण अशा तऱ्हेचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवणाऱ्या व्यक्तीच येथे नव्हत्या. खरे म्हणजे येथील जीवन हे व्यक्तिजीवन नव्हतेच. कारण येथे व्यक्तीच नव्हत्या, जाती होत्या. त्या जातींत व्यक्तीच्या स्वतंत्र जीवनाला स्थानच नव्हते आणि त्यामुळे समाजाच्या उत्कर्षापकर्षाचे चिंतन करावे, घडलेल्या व घडणाऱ्या इतिहासाचे अनुभव जमेस धरून त्यावरून काही निष्कर्ष काढावे, आणि त्याअन्वये समाजाची नवी घडी बसवावी, हा जो समाजातील तत्त्ववेत्यांचा प्रधान उद्योग तो या भूमीतून प्रायः लुप्तच झाला होता. या काळात या भूमीवर शेकडो आक्रमणे झाली. पण ती मारून काढण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी का नाही, आपली समाजरचनाच याला कारण आहे की काय, धनधान्यासाठी समृद्ध असा या देशाचा पूर्वी लौकिक असताना, सुवर्णभूमी म्हणून हा देश प्रतिद्ध असताना, आज येथे अन्नान्नदशा का झाली आहे, आपण व्यापारात मागे का पडलो, याची चिंता करणाऱ्या व्यक्तीच या समाजात नव्हत्या. खरे म्हणजे पूर्वीचा इतिहासच या लोकांना माहीत नव्हता. आपले पूर्वज धर्मप्रसारासाठी, व्यापारासाठी व साम्राज्ये स्थापन करण्यासाठी सर्व जगभर फिरत असत, याची या काळच्या लोकांना कल्पनाच नव्हती. स्वतःचा इतिहासच ज्यांना ठाऊक नाही ते लोक चिंतन कशाचे करणार आणि तसे चिंतन केल्यावाचून संस्था कशा निर्माण होणार ?'