पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६५४
 

वृत्ती होती. त्याने आर्यभट्टाच्या गणितास दोष दिलेले आहेत. तो म्हणतो ब्रह्मदेवाने सांगितलेले ग्रहगणित महान् काळ गेल्यामुळे खिळखिळे झाले आहे. ते मी विष्णुसुत ब्रह्मगुप्त स्पष्ट करून सांगतो. यावरून असे दिसते की ब्रहादेवाचे वाक्यही जसेच्या तसे मानता येत नाही, हे सांगण्याचे धैर्य त्या काळी होते. अशी वृत्ती असल्यामुळेच प्राचीन काळी आमची शास्त्रे जिवंत राहिली. पण पुढे ही वृत्ती पालटली व त्यामुळे शास्त्रांची वाढ खुंटली.'

शास्त्रे खुंटली
 हे पंचांग- संशोनाविषयी झाले. पण आपल्या सर्वच शास्त्रांची वाढ शब्दप्रामाण्यामुळे खुंटली असे अनेक ठिकाणी टिळकांनी सांगितले आहे. ते म्हणतात, 'पाश्चात्य राष्ट्रे अद्याप जिवंत आहेत आणि ती आपल्या शास्त्रांची वाढ करण्याच्या उद्योगात सतत मग्न असतात. प्राचीन काळी आमचे आचार्य असाच उद्योग करीत असत. पण पुढे ही वृत्ती सुटली व आमच्या शास्त्रांची वाढ खुंटली.' 'ख्रिस्ती शकानंतर काही शतकांनी आमच्या शास्त्रविद्येचा जिवंतपणा कमी होऊ लागला. आणि आमचे पंडित पूर्वाचार्यानी केलेले सिद्धान्तच खलीत बसले. हिंदुस्थानातील शास्त्रांची ही स्थिती, सदर शास्त्रे युरोपियन पंडितांच्या हातात पडल्यावर पालटली.' (केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. ४८५, ४८६). पाश्चात्य विद्यांचा आग्रह टिळक धरीत त्याशी हे सुसंगतच होते.

महात्माजी
 महात्माजी हे बुद्धिप्रामाण्यवादीच होते. त्यांना अंतर्ज्ञानशक्ती होती. 'आतला आवाज' असे या संदेशाला ते म्हणत. पण हे सर्व अपवादप्रसंग होत. आणि स्वतःला अंतर्ज्ञानी असले तरी श्रुतिस्मृतीप्रमाणे ते एखाद्या ग्रंथातले वचन प्रमाण मानीत, असे कधीच घडले नाही. त्यांचे सर्व व्यवहार व महत्त्वाचे निर्णय हे तर्क, अनुभव, बुद्धी यांनीच होत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बुद्धिप्रामाण्याबद्दल शंकाच नव्हती. त्यांची बुद्धिनिष्ठा व विज्ञाननिष्ठा जगजाहीर आहे. महात्माजींच्या आतल्या आवाजाला त्यांनी काही वेळा विरोधही केला आहे. तेव्हा त्यांच्या बुद्धिप्रामाण्याविषयी कशालाही वाद नाही.
 अशा रीतीने ब्रिटिश कालातील सर्व नेते बुद्धिप्रामाण्यवादी होते. मागल्या काळातल्या प्रमाणे ग्रंथप्रामाण्य चुकूनसुद्धा या नव्या नेत्यांनी कधी अवलंबिले नाही. म्हणूनच आपापल्या क्षेत्रात चौफेर प्रयत्न त्यांना करता आले आणि ते भारताचा उत्कर्ष साधण्यात यशस्वी झाले.
 ब्रिटिश कालामध्ये १९४७ पर्यंतच्या शंभर सवाशे वर्षात सर्वांगीण क्रान्ती घडवून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेण्याइतकी प्रगती येथल्या नेत्यांना कशी घडविता आली याचा