पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५३
नव्या प्रेरणा
 

स्वातंत्र्य म्हणजे हवा तसा विचार करण्याची व ते विचार वाग्द्वारा किंवा लेखनद्वारा प्रसिद्ध करण्याची मोकळीक. हल्लीच्या राज्यात आम्हांस जे स्वातंत्र्य आहे, तितके यापूर्वी स्वदेशी राजांच्या उत्कृष्ट कारकीर्दीतही नव्हते.' असे धन्यवाद त्यांनी सरकारला दिले आहेत.
 'ग्रंथावर टीका' या निबंधातही त्यांनी शब्दप्रामाण्यावर अशीच टीका केली आहे. 'आपणांहून जे थोर आहेत त्यांचे दोष काढण्याचा आपल्याला अधिकार नाही, अशी समजूत होती. असे म्हणणे म्हणजे चंद्रास कलंकी म्हणू नये किंवा सूर्यावर डाग आहेत असे म्हणू नये अशासारखेच आहे.' या तत्त्वाअन्वये विष्णुशास्त्री यांनी जुन्या शास्त्रीपंडितांवर किंवा खुद्द शंकराचार्यावरही कशी प्रखर टीका केली आहे ते प्रसिद्धच आहे.

आगरकर
 आगरकरांच्याविषयी तर बोलावयासच नको. बुद्धिवादाचे त्यांना जनक मानतात, ते अगदी यथार्थ आहे. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर हे बुद्धिवादी होते, सुधारक होते. पण नव्या सुधारणांना शक्यतो जुन्या श्रुतिस्मृतींच्या वचनांचा आधार शोधून काढण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. हा काहीसा शब्दप्रामाण्यवादच होय. आगरकरांनी यावर कडक टीका केली आहे. अशा रीतीने एका ऋषीविरुद्ध दुसरा ऋषी उभा करण्यात काही अर्थ नाही. शेकडो मनूंचे किंवा पाराशरांचे आधार तुम्ही दिलेत तरी 'आम्हांस इष्ट असेल ते आम्ही बोलणार आणि साध्य असेल ते करणार,' अशी त्यांची प्रतिज्ञाच होती. आणि त्यांनी केलेला स्त्रीस्वातंत्र्याचा व एकत्र शिक्षणाचा पुरस्कार, प्रवृत्तिवादाचे समर्थन, देव हे भूतपिशाच्च्यांपासून निर्माण झाले आहेत, हे त्यांचे प्रतिपादन, यावरून ती त्यांनी सार्थ करून दाखविली होती, यात शंकाच नाही. येथे इंग्रजांचे राज्य होते, म्हणून आगरकर सुरक्षित राहिले, नाही तर त्यांना वहिष्कारास बळी पडावे लागले असते. युरोपात तर शब्दप्रामाण्याविरुद्ध ब्र काढणाऱ्याला जिवंत जाळून मारण्याची शिक्षा होती. पण ती शिक्षा भोगूनही अनेक वीर पुरुषांनी तेथे बुद्धिप्रामाण्याची ज्योत जागती जिवंत ठेवली. म्हणूनच युरोपची प्रगती झाली. आणि हिंदुस्थानात तसे धैर्य एकानेही न दाखविल्यामुळे त्याचा अंधःपात झाला.

ब्रह्मवाक्यही-
 लो. टिळकांचा बुद्धिवाद किंवा बुद्धिप्रामाण्य फार उद्बोधक आहे. पंचांग संशोधनाच्या बाबतीत त्यांची बुद्धिनिष्ठा अनेक वेळा प्रत्ययास आलेली आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की 'केरूनाना छत्रे, दीक्षित यांच्यावर आधुनिक यवनाचार्य म्हणजे युरोपीय ज्योतिर्गणिती यांच्या संशोधनाचा परिणाम झालेला आहे. स्वतः वेध घेऊन जुने शास्त्र सुधारले पाहिजे, असे त्यांचे मत होते. पूर्वी ब्रह्मगुप्ताची अशीच