पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
४०
 

पुढे म्हणतात की उत्तरेत लोकसंख्या अतोनात झाली तेव्हा हे लोक दक्षिणेत वसाहती करण्यास आले. हे उच्चवर्णीय क्षत्रिय होते. मानव्य, हैह्य, भोज, यादव, नल, मौर्य, चालुक्य इ. शेकडो गोत्रांचे म्हणजेच ९६ कुळीचे मराठे होत. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या ९६ कुळींच्या कर्तृत्वाचा इतिहास होय.
 महिकावतीच्या बखरीच्या प्रस्तावनेत येथे कातवडी, कोळी, वारली, ठाकर है केव्हापासून राहात होते ते सांगून राजवाडे म्हणतात, महाराष्ट्र जितका महाराष्ट्रिकांनी बनविला तितकाच बहुतेक मांगेले, वारली, कोळी, कातवडी, लाडी, रांगडी इत्यादी पुंजांनी बनविला आहे.
 महाराष्ट्रातल्या लोकांपैकी कोण कोटून आले, ते कोणत्या वंशाचे होते, कोणाचे रक्त शुद्ध, कोणाचे मिश्र यासंबंधीची ही मते परस्पर-विसंगत आणि त्याचबरोबर प्रमाणहीन आहेत असे दिसून येईल. त्यामुळे त्यांचा विचार करण्याचे कारण नाही.

आर्य द्रविड
 कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांच्या मते पाणिनीच्या नंतरच्या काळी म्हणजे इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले व गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा वसाहती करून राहिले. अशोकाच्या शिलालेखात रास्टिक लोकांचा उल्लेख येतो ते रास्टिक म्हणजे हेच लोक होत. आंध्रभृत्यांचे वेळी ते एका सत्तेखाली आले तेव्हा भोजांचे जसे पूर्वी महाभोज झाले तसेच राष्ट्रिकांचे महाराष्ट्रिक झाले व त्यांच्यावरूनच पुढे महाराष्ट्र हे नाव पडले. वैद्यांच्या मते आर्याचे नागांशी उत्तरेतच मिश्रण झाले होते; आणि आर्य दक्षिणेत आले त्यांच्याबरोबर नागलोकही आले. हे नाग द्रविडवंशीय होत. म्हणजे महाराष्ट्रीय लोक आर्यद्रविड वंशोद्भव आहेत. या मिश्रणा- मुळेच त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री ही प्राकृत भाषा निर्माण झाली. ( भारत इतिहास सं. मं. वर्ष १३ वे, अंक १ ला . ) .
 अशोकाचे शिलालेख आणि महाभारतातील गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र इ. नावे यांचा या उपपत्तीला थोडा आधार आहे, त्यावर बसविलेली ही अनुमाने आहेत. त्यामुळे ही संभाव्य घटना आहे, एवढेच म्हणता येईल.

महारांचे राष्ट्र
 या देशात अत्यंत प्राचीन काळी महारांची वस्ती होती; व त्यांच्यावरूनच महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे नाव पडले, असे एक मत कोशकार मोल्सवर्थ यांनी गेल्या शतकात मांडले आहे. जॉन विल्सन यांनीही याच मताला पाठिंबा दिला होता. डॉ. केतकर यांनी 'प्राचीन महाराष्ट्र ' या आपल्या ग्रंथात हेच मत पुन्हा मांडले आहे. (पृ. २५-२७ ) विल्सन यांनी 'गाव तेथे महारवाडा' ही म्हण आधार म्हणून दिली आहे व तो आधार केतकरांनी ग्राह्य मानला आहे. केतकरांच्या मते अत्यंत