पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९
अस्मितेचा उदय
 

तीला आहे. ते वैभव येथे आहे असे दिसले तर या लोकांचे मूलस्थान कोणते होते व मूलवंश कोणता होता याला महत्त्व नाही. आणि ते वैभव नसले तर या लोकांच्या इतिहासाचा विचार करण्याला अर्थच नाही. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे या बाबतीत विद्वनांच्या मतांची नोंद घेण्यापलीकडे फारसे काही करण्याची आवश्यकता नाही आणि काही करता येण्यासारखे नाही. कारण विश्वसनीय असा पुरावा या बाबतीत मुळीच उपलब्ध नाही. म्हणून पंडितांच्या भिन्न मतांची फक्त माहिती पुढे देतो.

राजवाडे मत
 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 'राधामाधवविलासचंपू' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आपले मत मांडले आहे. इ. पू. ५००-६०० च्या सुमारास मगधातील महाराजांचे भक्त जे महाराजिक म्हणजेच महाराष्ट्रिक लोक ते तेथील बौद्ध व जैन धर्मीय राजांच्या जुलमाला कंटाळून दक्षिणेत वसाहत करण्यास आले. त्यांच्याबरोबरच कुरुपांचालांतून राष्ट्रिक नावाचे व उत्तरकुरू आणि उत्तरमद्र येथून वैराष्ट्रिक हे लोक आले. त्यांतील महाराष्ट्रिक है लोकसंख्येने खूपच जास्त असल्यामुळे सर्वांनाच पुढे महाराष्ट्रिक म्हणू लागले व त्यांच्यावरून या भूमीला महाराष्ट्र हे नाव पडले. हे लोक उत्तरेतून आले तेव्हा अनुलोम विवाह चालू होते. क्षत्रिय लोक शूद्रभार्या करीत. या शूद्रभार्यापासून झालेल्या संततीचा महाराष्ट्रिक लोकांत बराच भरणा होता. त्यामुळे हे लोक क्षत्रिय असले तरी कमतर क्षत्रिय होते. ते दक्षिणेत आले तेव्हा येथे नाग लोकांच्या आधीच वसाहती होत्या. या नागांशी त्या महाराष्ट्रिकांचा पुढील हजार वर्षात मिलाफ होऊन येथला आजचा मराठा समाज तयार झाला. त्यामुळे त्याच्या अंगी कर्तृत्व फारसे दिसून आले नाही. पाटिलकी, देशमुखी, सरदेशमुखी मिळवावी व टिकवावी यापलीकडे यांच्या ठायी धमक नव्हती. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव यांनी महाराष्ट्रात राज्ये, साम्राज्ये स्थापिली. पण ते सर्व राजवाडे यांच्या मते आर्य, अयोध्या, चेदी इ. प्रांतांतून आलेले म्हणजे परकी होत. त्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्रात परक्यांचे राज्य होय. त्या परक्यांच्या दास्यात महाराष्ट्रिक लोक इ.पू १ ल्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे दीड हजार वर्षे रखडत होते. भोसल्यांचे राज्य झाले ते महाराष्ट्रात पहिले स्वकीयांचे राज्य होय.
 राजवाडे यांनी आपल्या या मताला कसलाच आधार दिलेला नाही. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांना परकी का म्हणावयाचे ते त्यांनी सांगितलेले नाही आणि दुसरे असे की 'महाराष्ट्राचा वसाहत काल' या आपल्या प्रबंधात त्यांनी याच्या उलट लिहून ठेविले आहे. महाराष्ट्रातील पाटील, देशमुख हे सर्व अस्सल क्षत्रिय होत, असे ते म्हणतात. त्याचप्रमाणे रट्ट, महरट्ट, राष्ट्रिक, महाराष्ट्रिक हे जातीचे वा देशाचे नाव नसून प्रांताधिकाऱ्यांचे नाव आहे, राष्ट्र हा एक देशाचा विभाग, त्यावरील मुख्य तो राष्ट्रकुट, मोठ्या विभागावरील मुख्य तो महाराष्ट्रकूट असेही त्यांनी सांगितले आहे. ते