पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३७
प्रबोधनाच्या अभावी
 

आता आश्रयदाते कोणी नाहीत. कारण तेही भिकेस लागले आहेत (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३१८). लष्करी लुटालुटीचा परिणाम लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर काय होत असेल, हे यावरून ध्यानी येईल. म्हणूनच मनात वरचेवर येते की मराठ्यांनी दक्षिणेत निदान महाराष्ट्रात तरी स्थिर राज्य स्थापण्याचे धोरण अंगीकारावयास हवे होते.

आमची विद्या
 विद्या हे मनुष्याच्या मनुष्यत्वाचे पहिले लक्षण. विद्येवाचून मनुष्य केवळ पशू होय. ही विद्या दोन प्रकारची असते. अध्यात्म विद्या आणि भौतिक विद्या. आत्मा, मोक्ष, ज्ञान, भक्ती, योग, माया, कर्म ही सर्व अध्यात्मविद्या आणि रसायन, पदार्थविज्ञान जीवनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वैद्यक, गणित, इतिहास, भूगोल, ज्योतिष ही सर्व भौतिकविद्या होय. इ. सनाच्या सहाव्या सातव्या शतकापर्यंत या दोन्ही विद्यांचा अभ्यास भारतात होत असे. म्हणूनच भारताचा सर्व बाजूंनी उत्कर्ष होत होता. पुढे निवृत्ती आणि कर्मकांड ही बळावली आणि हळूहळू भौतिक विद्येचा येथे ऱ्हास होऊ लागला. संतांच्या कार्याच्या विवेचनात हे स्पष्ट केले आहे. आणि गौतम, नागार्जुन, आर्यभट्ट, वराहमिहीर यांसारखे शास्त्रज्ञ पुढे झाले नाहीत, यावरून हे स्पष्टच आहे. मुसलमानांच्या स्वाऱ्यांनंतर तक्षशिला, नालंदा, वलभी, विक्रमशीला ही विद्यापीठे नष्ट झाली आणि येथे सर्वत्र अंधार झाला. मराठ्यांच्या कारकीर्दीत येथील शास्त्री पंडितांनी महाराष्ट्रात एकही विद्यापीठ स्थापन केले नाही. या विद्येकडे त्यांनी लक्षच दिले नाही. मागील काळच्या पाणिनी, पतंजली, शंकराचार्य, रामानुज या सारख्यांच्या ग्रंथांवर टीका, त्या टीकेवर आणखी टीकाग्रंथ, आणि ते समजावे म्हणून आणखी प्रकाश, बोधिनी, अशा टीका, यातच शास्त्री- पंडितांचे आयुष्य खर्ची पडत असे. म. दा. साठे यांनी म्हटले आहे की गेल्या हजार बाराशे वर्षात म्हणजे मध्य- युगात, जुन्या ग्रंथांवर टीका लिहिण्यापलीकडे हिंदू विद्वानांच्या हातून विशेष काही झाले नाही (महाराष्ट्र जीवन, खंड २ रा, पृ. ११).

पुराणप्रिय
 महाराष्ट्रात अभ्यास होत असे तो सर्व अध्यात्माचा आणि पुराणांचा. पेशवे आणि त्यांचे मोठमोठे सरदार यांना ग्रंथसंग्रहाचा आणि ग्रंथवाचनाचा नाद पुष्कळ होता. पण हे ग्रंथ कोणचे ? रामायण, महाभारत, गीता, पुराणे, मार्गशीर्ष माहात्म्य, वैशाख- माहात्म्य ! याच्या जोडीला फारतर बखरी, तवारिखा, कैफियती हे पुराणवजा ग्रंथ. ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग, एकनाथी भागवत, मुद्गल रामायण, पांडवप्रताप, महीपतीची संतचरित्रे यांचेही वाचन होत असे. पण हे सर्व ग्रंथ मोक्षदायक आहेत. ऐहिक उत्कर्षापकर्षाशी त्यांचा संबंध नाही. नाना फडणिसाने सवाई माधवरावाच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. पण त्यासंबंधी लिहिताना सरदेसाई म्हणतात,