पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६३८
 

नानाची बुद्धी केवळ पुराणप्रिय असून कालाबरोबर धाव घेण्यास ती बिलकुल समर्थ नव्हती. स्नानसंध्या, पोथ्यापुराणे, परंपरेची नीती, दांडपट्टा, घोडदौड यांपलीकडे त्याची दृष्टी गेली नाही.' सवाई माधवरावाकरता एक भूगोलाचे पुस्तक तयार करावे, असे नानाच्या मनात आले. डॉ. फिंडले नावाच्या इंग्रजास त्याने हे काम सांगितले. त्याने त्या पुस्तकात काय लिहिले ? इंग्रजांची विलायत रूमशामनजीक आहे, रूमचा बादशहा मुख्य असून दिल्ली हा त्याचा सुभा आहे, इंग्रज हिंदुस्थानात आले ते दैवी योजनेनेच आले, अशा तऱ्हेचा बराच मजकूर त्याने दडपून लिहून ठेवला. मराठ्याच्या भौतिक विद्येची ही अवस्था होती.

सृष्टपदार्थ-संशोधन
 योगायोग असा की ज्या काळी येथे विद्या लुप्त झाली त्या काळात, तिचा युरोपात उत्कर्ष होऊ लागला. शं. वा. दीक्षित यांनी आपल्या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथात लिहिले आहे, 'कोपरनिकसाचा ग्रंथ शके १४६५ साली झाला. त्याच्या आधी आमच्या देशातील व युरोपातील ज्योतिष सारख्याच स्थितीत होते म्हटले तरी चालेल. कोपरनिकसाच्या आधी आमच्या देशातील शोधक पितापुत्र केशव दैवज्ञ व गणेश दैवज्ञ हे होऊन गेले. पण नंतर तसा शोधक येथे झाला नाही. युरोपात मात्र या लहान वृक्षाचा पुढे वटवृक्ष झाला.' हाच भावार्थ राजवाडे यांनी निराळ्या शब्दांत सांगितला आहे. ते म्हणतात, 'शहाजीच्या हयातीत युरोपात बेकन, डेकार्ट इत्यादी विचारवंत, सृष्टपदार्थ- संशोधन- कार्याचे वाली, पंचमहाभूतांचा शोध लावण्यास जारीने प्रोत्साहन देत होते. आणि आपल्याकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत, निपट निरंजन इ. संत पंचमहाभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन, मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफ यांचा विचार वमनप्राय वाटल्यास नवल नाही (दीक्षित, राजवाडे यांचे उतारे, संस्कृतिसंगम, द. के. केळकर, पृ. ३७३).

ग्रंथ
 विद्येचे प्रधान लक्षण म्हणजे ग्रंथनिर्मिती हे होय. मुकुंदराजापासून पेशवाईअखेर- पर्यंत येथे महाराष्ट्रात ग्रंथ विपुल निर्माण झाले. पण ते सर्व अध्यात्माचे ग्रंथ होत. भौतिक विद्येसंबंधी, ऐहिक उत्कर्षापकर्षाविषयी एकही ग्रंथ झाला नाही. आणि चमत्कार असा की पेशवाई संपून इंग्रजी राज्य येथे प्रस्थापित होताच पुढच्या पाऊणशे वर्षांत ऐहिक विषयांवर शेकडो ग्रंथ निर्माण झाले. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, जोतिबा फुले हे तर पंचवीस तीस वर्षांच्या आतच अशा प्रकारचे लेखन करू लागले. त्याआधी राजकारण, लोकशाही, कारखानदारी स्त्रीपुरुषसमता, व्यापारवृद्धी, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, अस्पृश्यता, जातिभेद धर्मातील वचन- प्रामाण्य, जगातील थोर पुरुषांची वॉशिंग्टन, नेपोलियन, शिकंदर अशा पुरुषांची