पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६३६
 

चाकू, मेणबत्त्या, कुलपे हे पदार्थ मुद्धा युरोपातून हळूहळू येथे येऊ लागले आणि खपू लागले. कनोज हे अत्तराविषयी प्रसिद्ध होते. पण तो हिंदी धंदाही हळूहळू पाश्चात्यांनी आक्रमिला. काच, कागद हे पदार्थ येथे होत असत. पण तेही युरोपातून येऊ लागले. १७६० साली नानासाहेबाच्या कारकीर्दीतच देशी कागदापेक्षा परदेशी कागद चांगला, असे ठरून गेले होते. हिंदुस्थान सुती वस्त्रांविषयी कार प्रसिद्ध. पण १७६० पासून इंग्लंडात कापसाची वस्त्रे विणण्यास प्रारंभ झाला. १७८२ साली वॅटने वाफेचा शोध लावला. त्यामुळे गिरण्या निघाल्या आणि मग येथला हातमागाचा धंदा इंग्रजांनी ठार मारला आणि येथल्या मालाच्या जगातल्या पेठाही हस्तगत गेल्या (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३४२). इंग्रजांच्या साम्राज्याकांक्षेच्या मागे हे वाफेचे बळ सतत उभे होते. तसले काहीच बळ मराठ्यांजवळ नव्हते. त्यामुळे मुलूखगिरीपलीकडे त्यांना काहीच करता आले नाही.

लष्करी लूट
 शेती, व्यापार आणि कारागिरी हे धनोत्पादनाचे मुख्य व्यवसाय. ते या देशात कोणत्या अवस्थेत होते ते येथवर सांगितले. आणि अशा स्थितीत दरसाल सर्व देशभर फिरत असलेल्या लष्कराने केलेली लूट आणि विध्वंस यांची भर, याविषयी मागे अनेक वेळा सांगितलेच आहे. वा. कृ. भावे यांनी 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या आपल्या ग्रंथात 'लोकस्थिती' या प्रकरणात याची सविस्तार माहिती दिली आहे. 'मोगलांचा हायदोस', संकटांची सवय', 'कोणीही कोणास लुटावे' या मथळ्यांवरूनच सर्व कल्पना येईल. 'कुंपणाने शेत खाल्ले' असा एक मथळा आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की स्वतःच्या राजाची स्वारी आली तरी लोक भयभीत होत. कारण लुटालूट होणारच ! धारचा तुकोजी पवार याची फौज कासारघाट चढून साकोऱ्यास आली. तेथे खुद्द शाहू महाराजांची बागायत होती. तीतही हत्ती-घोडे घुसवून तुकोजीने तिची संपूर्ण नासाडी करून टाकली. छत्रपतींच्या शेतीची ही अवस्था ! मग सामान्य रयतेच्या शेतीचे काय होत असेल ? तिचा विध्वंस शत्रूची लष्करेच करीत असे नाही. छत्रपती, पेशवे आणि सरदार यांच्या सेनाही लुटालूट करीत. कुंपणच असे शेत खात असे. मग धनोत्पादन कसे होणार आणि साम्राज्याचा विस्तार करण्यास लागणारा पैसा कोठून मिळणार ! लोकांच्या जीवनाला काही प्रमाणात तरी स्थैर्य असल्यावाचून धनोत्पादन होत नाही. शिवछत्रपतींना याची काळजी किती होती, ते मागे सांगितलेच आहे. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा कोणी हात लावावयाचा नाही, असे त्यांचे हुकूम असत. पण त्यांच्यामागे हा विचार राहिलाच नाही. शेतकऱ्यांना, सावकारांना, व्यापाऱ्यांना, लमाणांच्या तांड्यांना लुटणे, हा नियमच होऊन बसला. त्यामुळे सर्व हिंदुस्थान दरिद्री होऊन बसला. आग्रा, दिल्ली, येथून सुबक कारागिरीचा माल पेशवे मागवीत. त्यांच्या तेथील मुनिमांनी कळविले की आता इकडे कारागीरच राहिले नाहीत. कारण त्यांना