पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३५
प्रबोधनाच्या अभावी
 

अवलंबून नाहीना ?' विजयनगरच्या राज्यात कालवे होते. पंजाबात मुस्लिमांनी पाटबंधारे, कालवे यांकडे लक्ष दिले होते. मराठ्यांनी दिल्लीच्या बादशहाला ताब्यात घेण्याचा दरिद्री उद्योग सोडून, महाराष्ट्रात राज्यसत्ता प्रत्यक्ष स्थापण्याचे ठरविले असते, तर त्यांनाही इकडे लक्ष पुरविता आले असते. पण साम्राज्य- विस्तारासाठी आर्थिक पाया भक्कम करणे अवश्य आहे, हे मराठयांना कधी उमगलेच नाही !

येथले व्यापारी
 जी गोष्ट शेतीची तीच व्यापाराची. पूर्वीप्रमाणे आमचे व्यापारी सर्व जगभर हिंडत असते, तर लाखो रुपयांचे धन त्यांनी मराठ्यांना पुरविले असते. पण समुद्रगमननिषेध हा दर ठिकाणी आडवा येत असे. देशातला व्यापार तरी मराठ्यांच्या हाती होता काय ? शून्य ! दुर्गादेवीच्या दुष्काळात येथला मराठा व्यापारी वर्ग जो बसला तो बसलाच. फिरून त्याने डोके वर काढले नाही. इतर प्रांतीयांच्या हाती सर्व व्यापार गेला. आणि त्यांतील अनेक इंग्रजांना, धनाचेच केवळ नव्हे, तर गुप्त बातम्या देण्याचेही साह्य करीत. युरोपात पंधराव्या सोळाव्या शतकात जी क्रांती झाली ती विद्यासंपन्न लोकांइतकीच व्यापाऱ्यांनीही केली आहे. आणि येथले व्यापारी, मराठा सरदारांप्रमाणेच इंग्रजांना सर्वतोपरी साह्य करीत होते ! कारागिरीतही महाराष्ट्र मागासलेलाच होता. कलाकुसरीच्या वस्तूंतील महाराष्ट्राची लंगडी बाजू नाना फडणिसाच्या काळातही फारशी सुधारली नाही. मुलाम्याची अत्तरदाणी, सतारी इ. अनेक वस्तू परप्रांतातून मागवाव्या लागत. जयपूरचे कारागीर पुण्यास आणण्याचा नाना फडणिसाचा प्रयत्न होता, पण तो जमला नाही (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३१७).
 येथला माल युरोपात नेणे हा व्यापार मराठ्यांनी केला नाही. पण साखर, सुका मेवा इ. अशिया खंडातून, चीन, अफगणिस्थान येथून येणारा माल आपण आणावा, असा उद्योगही त्यांना सुचला नाही. तोही उद्योग पाश्चात्यच करीत. लाखालाखाचे कर्ज देणारे पुण्यात शंभर दीडशे ब्राह्मण सावकार होते. ब्राह्मणांनी सावकारी करणे हे कुठले चातुर्वर्ण्य ! आणि ते धर्मात खपत असे, तर हे आशियातले व्यापार त्यांनी का नाही ताब्यात घेतले ? तेथे चातुर्वर्ण्य का आड आले ? कोणी हीन जाती वेदोक्त कृत्ये करीत आहेत की काय, यांवर नजर ठेवण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा ब्राह्मणांनी हा उद्योग केला असता तर साम्राज्याला पैसा तरी मिळाला असता.

आर्थिक आक्रमण
 हे तर त्यांनी केले नाहीच. पण हळूहळू येथे होणाऱ्या वस्तू यंत्राच्या साह्याने जास्त सुबक करून, पाश्चात्य लोक येथला व्यापार मारू लागले, त्यालाही येथे कोणी आळा घातला नाही. व्यापार नाही, कारण परदेशगमन निषिद्ध. आणि यंत्रविद्या नाही, कारण न वदेत् यावनीं भाषां प्राणैः कंठगतैरपि । 'जीव गेला तरी परकी भाषा उच्चारू नये !'