पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६३२
 

आहे ? हेच इतर अनेक जातींचे होते. तेव्हा जातीमुळे अर्थव्यवस्थेला स्थैर्य आले, या म्हणण्यात काही अर्थ नाही. पण आचारविचारांच्या जखडबंदीमुळे, आणि व्यवसायांच्या तात्त्विक बंदीमुळे समाजातली स्पर्धा नष्ट झाली आणि त्याची प्रगती खुंटली हे मात्र निश्चित. जातीमुळे स्थैर्य आले असे सांगणारे पंडितही, या स्थिरावस्थेमुळे स्पर्धा नष्ट झाली आणि प्रगती खुंटली, हे मान्य करतातच.

स्त्रियांची दैन्यावस्था
 आता स्त्रियांच्या स्थितीचा विचार करू. स्त्रियांना अनेक शतके शिक्षण बंद झाले होते. ती बंदी या काळातही होतीच. शिवाय बालविवाह हे मोठे अरिष्ट त्यांच्यावर होते. त्या काळी तर ते भयंकरच होते. लढाईत पुरुष मृत्यू पावणे हा नित्याचा क्रम होता. त्यामुळे एकेका घरात दहा दहा विधवा असत. त्यांच्या जीवनात कोणते सुख असेल, याची कल्पनाच केलेली बरी ! पण यापेक्षा भयंकर म्हणजे विषम विवाह ! अंबूजी इंगळे हा ८१ व्या वर्षी मृत्यू पावला. पण त्यापूर्वी एक महिना त्याचे लग्न ठरले होते. मुलगी अर्थातच ८/९ वर्षांची होती. नशीब तिचे म्हणून ते लग्न झाले नाही. नाना फडणिसाला नऊ बायका होत्या. तो साठाव्या वर्षी वारला तेव्हा त्याची सर्वात धाकटी बायको जिऊबाई नऊ वर्षांची होती. लग्न ही त्या वेळी पुरुषाला एक करमणूकच होती. सहज जाता जाता ते लग्न करीत. तेव्हा स्त्रीजीवनाची काय परवड असेल याची सहज कल्पना येईल. महादजी शिंदे याने दक्षिणेत आल्यावर मरण्यापूर्वी वर्ष दोन वर्षे, एक बालिका बरी दिसली म्हणून, तिच्याशी लग्न केले. त्याच्या मृत्युसमयी ती वयातही आली नव्हती. राधाबाई, अहल्याबाई, गौतमाबाई अशा काही स्त्रियांची नावे इतिहासात गाजली आहेत. पण तेवढ्यावरून स्त्रियांना समाजात काही प्रतिष्ठा होती, असे मानता येणार नाही. सतीची चाल हे कशाचे लक्षण आहे ? पुरुषामागे स्त्रीने जगणे हे पापच होय, अशी रूढी होती. त्यामुळे हजारो स्त्रिया- दहा बारा वर्षांच्या बालिका सुद्धा सती जात. या अनर्थाला, या क्रौर्याला, काही सीमा आहे काय ?
 स्त्रियांची लग्ने आठव्या नवव्या वर्षी होत. मुलगे त्यावेळी फार तर बारातेरा वर्षांचे असत. पण अनेक घरांत मुलगे आडदांड मग्रूर असत आणि पत्नीला हर प्रयत्नाने जवळ घेण्याचा, त्यावेळीही, प्रयत्न करीत. दुसऱ्या बाजीरावाची गोष्ट वा. कृ. भावे यांनी दिली आहे. आई आनंदीबाई हिने मना करताच तो तिला वाटेल ते अभद्र बोलला. तेव्हा तिने त्याला लाथांनी तुडविले. पण असा प्रसंग पुरुषाने आणला तर त्यातून किती लहान बालिकांची सुटका होत असेल, ते एक परमेश्वरच जाणे.

कर्तृत्व खुंटले
 अस्पृश्येविषयी त्या वेळी काय स्थिती असेल याची सहज कल्पना येईल. इंग्रजी राज्य शंभर दीडशे वर्षे झाले. त्यानंतर स्वराज्य पंचवीस वर्षे झाले. अनेक कायदे