पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३३
प्रबोधनाच्या अभावी
 

झाले. तरी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याचा हक्कही अस्पृश्यांना मिळालेला नाही. मग त्या वेळी, तेव्हा यातले काहीच नव्हते तेव्हा, अस्पृश्यांची स्थिती कशी नरकासमान असेल, हे कशाला सांगायला पाहिजे ? काही अस्पृश्यांना सैन्यात प्रवेश मिळे. काही वरच्या पदाला क्वचित जात. पण एवढेच. मल्हारराव होळकर सेनापती झाला, राजा झाला. पण धनगर समाजाच्या स्थितीत अणुमात्र फरक पडला नाही. तीच स्थिती या देशात सर्व सुधारणांची होती. तेवढ्या तेवढ्या पुरते अपवाद होत. समाजही ते मान्य करी. पण सर्व जातींना सर्व क्षेत्रांत उत्कर्षाची संधी मिळत असे, असा त्याचा अर्थ नाही. आणि ती नाही म्हणजे समाजाच्या उत्कर्षाला पुरेसे कर्तृत्व निर्माण होणे कधीही शक्य नाही. मराठेशाही बुडण्याचे हे प्रधान कारण आहे. स्त्री, शूद्र, अस्पृश्य व कनिष्ठ जाती यांच्यावर आणि ब्राह्मण व मराठे या वरिष्ठ जातींवरही इतकी बंधने जखडलेली होती की सर्व प्रकारचे, राष्ट्राला अवश्य ते कर्तृत्व या समाजात फुलून येणे हे शक्यच नव्हते.

क्रांती अशक्य
 हे सर्व सांगितल्यानंतर समाज आणि व्यक्ती यांच्या परस्पर संबंधाविषयी स्वतंत्र पणे काही सांगण्याची गरज नाही. समाजाने सर्वप्रकारच्या आचार-विचार-उच्चारां- वर अत्यंत कडक अशी बंधने घातलेली होती. त्यांचा भंग केल्यास जातिबहिष्काराची शिक्षा होत असे. त्यामुळे व्यक्तीला नवे काही करण्याची छाती होणेच शक्यच नव्हते. आणि ते नाही, म्हणजे क्रांती नाही, परिवर्तन नाही ! क्रांती नाही, मग उत्कर्ष कोठला ?

स्पर्धा नाही
 धर्म आणि समाजरचना यांचा विचार केल्यानंतर आता तत्कालीन अर्थव्यवस्थेचे रूप पाहावयाचे. सर्व हिंदुस्थान आणि अर्थातच महाराष्ट्र, त्या वेळी ग्रामप्रधान होता. या ग्रामात म्हणजे खेड्यात पाटील हा राजा आणि कुळकर्णी हा त्याचा प्रधान होता. या खेड्यांची अर्थव्यवस्था ही शेतकरी, बलुतेदार आणि अलुतेदार यांच्यावर उभी होती. चौगुला, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी, महार आणि चांभार हे बलुतेदार आणि तेली, तांबोळी, साळी, शिंपी, माळी, सनगर, गाेंधळी, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाणी, वाजंत्री, घडशी, तराळ हे अलुतेदार असत. बहुतेक सर्व खेडी स्वयंपूर्ण असत. सुतार, लोहार हे ज्या गावचे त्या गावास, तेथलेच काम त्यांनी करावयाचे आणि वर्षअखेर मळणीच्या वेळी खळ्यावर जाऊन शेतकऱ्याकडून आपल्या कामाबद्दल मोबदला म्हणून भात, नाचणी, ज्वारी असे धान्य घ्यावयाचे. असा हा सर्व कारभार असे. स्वयंपूर्णतेमुळे कारागिरीत प्रगतीचा प्रश्नच नव्हता. कारण स्पर्धा कशातच नव्हती. माल चांगला वाईट असाही प्रश्न नव्हता. कारागीर देईल तो माल सर्वांनी घ्यावयाचा. जातिबंधनांमुळे जशी स्पर्धा नव्हती तशीच या व्यवस्थेतही नव्हती.