पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६३०
 


कडक जातिनिर्बंध
 पण हा वरवरचा विचार झाला. बाराव्या शतकानंतर विद्या, कला, व्यापार, साहित्य, या दृष्टींनी मराठ्यांची कसलीही प्रगती झाली नाही. याला अत्यंत कडक असे जातिनिर्बंध हे एक प्रधान कारण आहे, यात वादच नाही. कपडे कसे पेहेरावे, बांगड्या कसल्या घालाव्या, भांडी कसली वापरावी, लग्नात मिरवणुकी कशा काढाव्या, असल्या बाबतीत सुद्धा जातिबंधने कडक असत आणि याविषयी कज्जा झाला तर भागवत पुराण, विष्णू पुराण, चरणव्यूह, शूद्रकमलाकर, यातिनिर्णय यांसारखे ग्रंथ पाहून, किंवा पूर्वापार वहिवाट काय आहे ते पाहून निर्णय होत असे. म्हणजे ग्रंथ आणि रूढी यांच्या शृंखलांत हा समाज इतका जखडलेला होता की स्वतंत्र आचार तर राहोच, पण स्वतंत्र विचार करण्याची सुद्धा येथे सोय नव्हती. परदेश राहिला, परप्रांत राहिला, पण साधे मुंबईला राहून परत येणे हे सुद्धा कठीण होते. कारण इतर जातींचा अन्नोदक संसर्ग तेथे होण्याचा संभव ! तसा नुसता संशय आला की त्या माणसावर बहिष्कार पडे. आणि तुरुंगवास, फाशी यापेक्षाही बहिष्कार हे शस्त्र फार भयानक होते. मुलाबाळांसंकट मनुष्याचे जीवनच त्यामुळे उद्ध्वस्त होण्याचा प्रसंग येई. युरोपातही बाराव्या तेराव्या शतकापर्यंत धर्माचारांच्या बाबतीत अशीच स्थिती होती. पण तेथे जॉनहस, लूथर, काल्हिन, कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ इ. वीरांनी पोपशी लढा करून त्याची सत्ता हाणून पाडली आणि प्रगतीचा मार्ग खुला केला. तसा मार्ग खुला करण्याचा प्रयत्नही भारतात व महाराष्ट्रात झाला नाही. आणि त्याला कारण येथले जातिनिर्बंध ! त्या निर्बंधांना आधार ग्रंथांचा किंवा वहिवाटीचा. मनुष्य एकदा स्वबुद्धीने विचार करीनासा झाला, तो वचनप्रामाण्याच्या आहारी गेला की त्याची सर्व प्रगती खुंटते. युरोपात त्या शतकात धर्मपीठांनी जी जखडबंदी केली होती तीच येथे जातिभेदाने केली होती. त्यामुळेच येथे कोणत्याही क्षेत्रात प्रगती झाली नाही आणि मुस्लिम, पोर्तुगीज, इंग्रज जो येईल त्याच्या आक्रमणास हा समाज बळी पडत गेला. महाराष्ट्रात प्रारंभी सांगितल्याप्रमाणे शिवछत्रपतींनी क्रांतीची बीजे पेरली होती. पण ती रुजली नाहीत.

अमंगळ भेद
 प्रभुजातीचे उदाहरण पाहा. शिवछत्रपतींनी बाळाजी आवजी चिटणीस याला, त्याचा मुलगा खंडो बल्लाळ याची, मुंज वैदिक विधीने करण्याची परवानगी दिली होती. परंतु शंभू छत्रपतींनी तो बेत रद्द करविला. शाहू छत्रपतींच्या वेळी गोविंदराव चिटणीस यांनी प्रयोगाला आपल्या बंधूंच्या हस्ते ब्राह्मणांच्या मदतीने अतिरुद्राचे अनुष्ठान करविले. पण शाहू शत्रपतींनी ब्राह्मणांची सभा भरविली- प्रभू हे शूद्र आहेत, असा निर्णय सभेने दिला. नारायणराव पेशव्याच्या वेळी आणि पुढे नाना फडणिसांच्या वेळीही प्रभूंच्यासंबंधी ब्राह्मणांच्या सभेने असाच निर्णय दिला. या ब्राह्मणांना वेद कळत