पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२९
प्रबोधनाच्या अभावी
 

घेतल्याची उदाहरणे आढळतात. पण तशी कायम रूढी शास्त्री पंडितांनी पाडली नाही. नाहीतर लक्षावधी वाटलेले हिंदू स्वधर्मात देऊन पाकिस्तानचा प्रश्न निर्माणच झाला नसता. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे, असा काही सिद्धान्त शिवछत्रपतींनी सांगितला आहे, दुष्ट तुरूक यास साह्य करणे हा अधर्म होय, असे तत्त्व सांगितले आहे, याची मराठेशाहीत कधी कोणाला आठवणही झाली नाही. यामुळे गायकवाड, भोसले, सखाराम बापू इ. सरदार खुशाल शत्रूला जाऊन मिळतात. सामान्य जनांना याचा कसलाच विधिनिषेध नव्हता. मुसलमान, इंग्रज, पोर्तुगीज व आपण हिंदू असा भेदाभेद, वैयक्तिक क्षेत्र सोडून, त्यांनी कधीच केला नाही. सर्व पक्षांत मराठ्यांतील सर्व जातीचे लोक नेहमी असत. तेव्हा समष्टिधर्म हा महाराष्ट्रात नव्हताच असे म्हटले पाहिजे. ते सर्व हिंदू होते. त्या धर्माचा त्यांना अभिमानही होता. पण तो सोवळेओवळे, जातींचे अचार येवढ्यापुरताच. हिंदुधर्माला काही सामाजिक रूप आहे, अभ्युदयाचा व धर्माचा काही संबंध आहे, एकधर्मीय लोकांच्या संघटनेला काही महत्त्व आहे, याची जाणीव मराठयांना कधी झाली नाही. तशी असती तर मराठयांचे राज्य बुडाले नसते.

समाजरचना
 समाजरचनेच्या दृष्टीने विचार करावयाचा तर चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीपुरुष संबंध आणि व्यक्ती व समाज यांचे संबंध येवढ्याचा विचार केला पाहिजे. यांपैकी चातुर्वर्ण्य हा शब्द हिंदूंच्या तोंडी रूढ आहे इतकेच. अगदी आरंभीचा काळ सोडला तर येथे विवाह व व्यवसाय या दृष्टीने चातुर्वर्ण्य कधीच नव्हते. वेदकाळी सुद्धा एकाच घरातले लोक भिन्नभिन्न व्यवसाय करताना दिसतात. याविषयी तपशील मागे येऊन गेलाच आहे. त्याची पुनरुक्ती येथे करण्याचे कारण नाही. मुख्य गोष्ट ही जातिधर्माच्या जंजाळातून मराठेशाहीत लोक कधीही मुक्त झाले नव्हते.

जातिभेद
 मराठेशाही कशाने बुडाली याचा विचार करताना जातिभेद हे कारण मुळीच नव्हे, असे बहुतेक सर्व अभ्यासकांनी सांगितले आहे. आणि वरवर पाहता ते खरे आहे. जाती-जातींचे तट असे मराठा राजकारणात कधी पडलेले दिसत नाहीत. माधवराव व राघोबा हे उदाहरण नेहमी देतात. दोघेही कोकणस्थ ब्राह्मण. पण प्रत्येकाच्या पक्षाला ब्राह्मणातील सगळ्या पोटजाती होत्या. मराठे व इतर जातीचे लोकही दोन्ही पक्षांत होते. असेच सर्वत्र घडलेले दिसते. कोकणस्थ, देशस्थ, सारस्वत, कऱ्हाडे, मराठा शाण्णव कुळीचे व इतर यांच्यांत आकस नव्हते असे नाही. कधी कधी त्याचे परिणामही होत. पण मराठ्यांचे राजकारण यामुळे नासले, दुही फितुरी यांच्यामागे जातिभेद होता, असे कधी झाले नाही. त्यामुळे मराठेशाही जातिभेदामुळे बुडाली, असे म्हणता येत नाही.