पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६२८
 

अर्वाचीन काळी अभ्यासक सांगतात. ज्ञानेश्वरानंतरच्या संतपंडितांनी त्याचा परामर्श केलेला नाही. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने मराठा समाजाचा जीवनौघच सर्व बदलला. वारकरी पंथाचा त्या ग्रंथाने पायाच रचला. तसा काही प्रकार चिद्विलासवादाने झाला नाही. तेव्हा मराठा समाजाने शंकराचार्याचा अद्वैत वेदांतच स्वीकारला यात शंका नाही.

नीती
 नीतीच्या दृष्टीने पाहता सत्य, दया, परोपकार इ. जी नीतीची शाश्वत तत्त्वे तीच मराठा समाजाने स्वीकारलेली आहेत. त्यांचा आचार कोणी किती केला हा भाग निराळा. मराठा काळात, ब्रह्मेंद्र स्वामी, कायगावकर दीक्षित, ज्योतिपंत महाभागवत इ. सत्पुरुषांनी धर्मशाळा बांधणे, तलाव, विहिरी खणणे, देवालये बांधणे अशी समाजसेवेची बरीच कार्य केली आणि समाजाची सेवा करण्याचे शिक्षण मराठा समाजाला स्वोदाहरणाने दिले.

आचार
 आचाराच्या दृष्टीने पाहता 'चतुर्वर्गचिंतामणी' इ. ग्रंथांत सांगितलेली सर्व प्रकारची व्रते- वैतल्ये, तीर्थयात्रा, अनुष्ठाने, ब्राह्मणपूजा व ब्राह्मणभोजने, देवपूजा व देवाचे उत्सवसमारंभ, पाठशाळा, स्नानसंध्या, अग्निहोत्र, इ. सर्व आचारधर्म महाराष्ट्रात सर्व समाजात चालू होता. त्याबरोबरच भुतेखेते, चेटुक, ग्रहदशा, ग्रहशांती यांवरही समाजाचा विश्वास होता आणि त्यामुळे त्या आपत्तींच्या निवारणासाठी ब्राह्मणांनी सांगितलेले उपायही समाज करीत असे.

वैयक्तिक धर्म
 पण धर्माच्या बाबतीत मुख्य गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की मराठे आचारीत तो सर्व धर्म वैयक्तिक होता. समर्थांनी व शिवछत्रपतींनी समाजाच्या अभ्युदयासाठी जो धर्म सांगितला त्याचे आचरण महाराष्ट्रात कोणी केले नाही, हे वेळोवेळी मागे सांगितलेच आहे. नीलकंठ, भट्टोजी दीक्षित हरी दीक्षित. नागोजी भट्ट, नीळकंठ शास्त्री थत्ते असे अनेक शास्त्री या काळात होऊन गेले. पण स्वतंत्रपणे समाजाला नवा धर्म सांगण्याची, किंवा शिवसमर्थांनी सांगितलेल्या धर्माचे विवेचन करण्यासाठी ग्रंथ लिहिण्याची बुद्धी एकालाही झाली नाही. तशी कुवतच त्यांच्या ठायी नव्हती. परदेशगमन जे एकदा निषिद्ध ठरले, ते चालू करण्याचा प्रयत्न शिवछत्रपतींनी केला. पण पुढे तो चालला नाही. राघोबाला मुंबईहून सुरतेला बोटीने नेण्याचा इंग्रजांचा विचार होता. पण 'धर्म बुडतो म्हणून तो गेला नाही. अर्थातच या समजुतीमुळे परदेशी व्यापार हा चालू शकला नाही. शुद्धीबद्दल हेच. छत्रपतींनी धर्मातरितांची शुद्धी करण्याचा पायंडा पाडला. पुढे क्वचित् कोठे बाटलेल्यांना शुद्ध करून स्वधर्मात