पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३३.
प्रबोधनाच्या अभावी
 



 साहित्य आणि कला यांच्याइतकीच धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था आणि विद्या ही संस्कृतीची अंगे आहेत. किंबहुना तीच अधिक महत्त्वाची आहेत. पण एक- तर आधीच्या कालखंडात त्यांच्या मूलतत्त्वांची चर्चा येऊन गेलेली आहे. आणि बहामनी व मराठा कालखंडातही वेळोवेळी त्या दृष्टीने विवेचन केलेले आहे. तेव्हा आता फक्त वर्तमाठी त्यांचे विवेचन येथे करावयाचे आहे.

धर्म-तत्त्वज्ञान
 तत्त्वज्ञान, नीती, आणि आचार ही धर्माची तीन अंगे होत. यांपैकी तत्त्वज्ञानाचा विचार करता असे दिसते की मुकुंदराजापासून संत, पंडित, इतर सत्पुरुष आणि सामान्यजन यांनी शंकराचार्याचा अद्वैत वेदान्ताचा सिद्धांतच स्वीकारलेला आहे. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या-माया- आहे आणि जीव आणि ब्रह्म हे एकरूपच आहेत, हा तो सिद्धांत आहे. याबरोबर, कर्म, पुनर्जन्म, ज्ञान, मोक्ष याविषयीचे विचारही वेदान्त- पंथाचेच सर्वांनी स्वीकारलेले आहेत. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात मायावादाचे खंडन करून 'चिद्विलासवाद' मांडला आणि विश्व हे माया नसून सत्य आहे असे मत प्रस्थापित केले, असा एक पक्ष आहे. सोनोपंत दांडेकर, तर्कतीर्थ जोशी या पक्षाचे आहेत. पण रा. द. रानडे, डॉ. शं. दा पेंडसे यांसारख्या पंडिताना हे मत मान्य नाही. आणि हा वाद इतका जटिल आहे की त्याचा केव्हा निश्चित निर्णय लागेल असे वाटत नाही. दुसरे असे की ज्ञानेश्वरांच्या या सिद्धांतामुळे मराठा समाजावर काही परिणाम झाला आहे असे दिसत नाही. तसा काही निराळा सिद्धांत आहे, हे