पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६२६
 

खजुराहो, वेरूळ, अजंठा, ताजमहाल, गोल घुमट यांसारखी कीर्ती मराठा कालात कोणत्याही कलाकृतीला मिळाली नाही.
 राहता राहिली नाट्यकला. तिच्याविषयी काही लिहिण्याची गरजच नाही. भारुडे, तमाशा, लळिते, दशावतारी खेळ यापलीकडे येथली नाट्यकला त्या काळात कधी गेलीच नाही. शाकुंतल, मृच्छकटिक, उत्तर-रामचरित्र किंवा हॅम्लेट, ऑथेल्लो, डॉल्स हौस अशा दर्जाचे एकही नाटक मराठीत त्या काळी लिहिले गेले नाही. तमाशा, लळिते हे नाटयाचेच प्रकार होत. पण ते अगदी प्राथमिक रूपाचे. त्यांना कला म्हणणे कठीण आहे. बांधीव कथानक, सुंदर व्यक्तिरेखा, विकसत जाणारा समरप्रसंग, असले त्यात काही नाही. आदिवासींची जशी नृत्ये तशीच ही नाट्यकला. फार तर एखादे पाऊल पुढे, इतकेच.
 मराठी साहित्य व कला याचा संसार हा असा आहे. यावरून असे दिसते की जे राजकीय पराक्रमाच्या बाबतीत, तेच कलेच्या बाबतीत घडले. मराठ्यांनी पराक्रम केला, मोठा पराक्रम केला. पण त्यामागे धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थव्यवस्था किंवा एकंदर जीवन याविषयी तत्त्वदृष्टी अशी कोणतीच नव्हती. बाहुबलाने ते पराक्रम करीत गेले एवढेच. तेच साहित्याच्या आणि कलेच्या बाबतीत झाले. या दोन्ही कार्याच्या मागे तत्त्वदृष्टी काहीच नव्हती. काल जाणण्याची शक्ती जशी राजकीय वीर पुरुषांत नव्हती, तशीच ती कलाकारांतही नव्हती. त्यामुळे जगाच्या दृष्टीने पाहता जपान, इंग्लंड, रशिया यांसारखे अलौकिकत्व मराठ्यांना लाभले नाही.