पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६२४
 

संगीतज्ञ होता. अल्लाउद्दिन खिलजीने यादवाचा पराभव केल्यावर त्याला सक्तीने दिल्लीस नेले आणि तेथे त्याने आणि अमीरखुश्रू याने आजची भारतीय संगीतपद्धती उदयास आणली. खुश्रू ती गोपाल नायकापासूनच शिकला आणि मग त्यानंतर तिचा उत्तर हिंदुस्थानात प्रसार झाला. आज आपण उत्तर हिंदुस्थानातून ती कला आली, असे म्हणतो. पण ती मूळची महाराष्ट्रीय आहे. पुढे स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर येथे तिचा व्हावा तसा विकास झाला नाही हे निराळे.
 महानुभाव पंडित दामोदर याची हिंदी भाषेतील रागतालबद्ध अशी काही पदे सध्या उपलब्ध झाली आहेत. त्यावरून दामोदर पंडित मोठा संगीततज्ज्ञ होता असे दिसते. पुढे नाव घेण्याजोगा संगीततज्ज्ञ म्हणजे मागे उल्लेखिलेला दासोपंत हा होय. (१५५१- १६१६) त्याच्या सवालक्ष पदांपैकी सोळाशे पदे राग-तालांत बद्ध असून त्यांत सुमारे पंचेचाळीस राग आले आहेत. रामदास तर 'धन्य ते गायनी कळा' असे म्हणत असत. समर्थांचा जो पदसंग्रह प्रसिद्ध आहे त्यात प्रत्येक पदास राग व ताल सांगितलेले आहेत. समर्थांचा शिष्यसंप्रदाय दक्षिणेत होता. त्यामुळे तिकडील हरिदासी गायकीवरही याचा प्रभाव पडलेला आहे. इब्राहिम आदिलशहा (२ रा) (१५८०- १६२७) हा कवी असून अनेक भाषाभिज्ञ होता. मराठी त्याला उत्तम येत असे. त्याने स्वतः निरनिराळ्या रागांत व तालांत धृपदे बांधली असून त्यांतील पहिली रचना गणपतीवर असून दुसरी सरस्वतीवर आहे. हा शिवपूर्व कालचा इतिहास झाला.

सामान्य
 शिवकालानंतर पेशव्यांच्या वेळी दरबारी उत्सव, तमाशा, कीर्तने यातून संगीताचा प्रसार झाला. शाहू महाराजांनी उत्तरेतून काही पोरी आणून त्यांना नर्तकी व गायिका करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो सफल झाला नाही. पेशव्यांच्या दरबारात गणेशोत्सवात गवयांचे गायन होत असे. रघुनाथराव व बाजीराव पेशवे यांच्या पदरीही गवई असत. पण पुष्कळ वेळा मोठे गवई परप्रांतातून बोलाविलेले आढळतात. या सर्वांवरून एक गोष्ट दिसते की आज पलुसकर, वझे, भातखंडे अशांनी जो शास्त्रोक्त अभ्यास करून गायनकलेचा विकास केला आहे, तसा यादवांच्या विनाशानंतर मराठा कालात झाला नाही. गायनवादन याची हौस मराठा राज्यकर्त्यांना व सरदारांना होती. पण येथे कोणी असामान्य गवई उदयास आला, असे दिसून येत नाही. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात वा. कृ. भावे यांनी मोठ्या कसोशीने माहिती जमा करून, 'गायन, वादन व नर्तन' या दहाव्या प्रकरणात ती दिली आहे. तीवरून हे अगदी स्पष्ट होते. त्यांनी काही कलावंत व कलावंतिणी यांची नावे दिली आहेत. पण ही सर्व मध्यम- अगदी प्राथमिक नव्हे- स्वरूपाची कला, एवढेच त्यांच्या कलेचे रूप दिसते. प्रारंभी दिलेल्या व्याख्येप्रमाणे श्रेष्ठ कला येथे अवतरली नव्हती, असेच म्हणावे लागते.