पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२३
साहित्य आणि कला
 

आलेच आहे.) त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बखरी. त्यांना ऐतिहासिक दृष्टीने फारसे महत्त्व नसले तरी साहित्याच्या दृष्टीने निःसंशय आहे. बखरीतले काही काही भाग अगदी काव्यमय आहेत, आणि मराठी राज्याचा अभिमान हा त्यात रस असल्यामुळे बखरींना आगळे महत्त्व आहे.

कलासौन्दर्य
 मराठी काळातील साहित्यसौंदर्याचा विचार येथवर केला. आता कलासौंदर्याचा विचार करावयाचा. साहित्य- संगीत- कला ज्याला नाही तो पशु होय, असे एक सुभाषित आहे. यावरून मानवी संस्कृतीत कलेला काय स्थान आहे, हे ध्यानात येईल. मनुष्याचे ते प्रधान लक्षणच येथे मानलेले आहे.
 संगीत, नृत्य, नाट्य, चित्र आणि शिल्प या पाच प्रमुख कला होत. या कलांचा विचार केला तर असे दिसेल की मानवाच्या जन्मापासून, त्याच्या वन्य अवस्थेच्या कालापासून, या कला, प्राथमिक, बोजड स्वरूपात का होईना, त्याच्या जीवनाशी निगडित आहेत. जंगली माणसांनीही गुहांमधून काही चित्रे रेखलेली आज आढळतात. भिल्ल, कातकरी, ठाकूर इ. आदिवासी लोकही नृत्य करताना व काही गाणी गाताना दिसतात. इतर कलांचे असेच काही अवशेष प्राचीन उत्खननात आढळून येतात. तात्पर्य असे की मानवाला उपजतच कलेची आवड आहे.

निकष
 पण आपल्यासमोर वरील कलांची नावे घेताना या स्वरूपातल्या कला नाहीत. खरी कला म्हणजे नवनिर्मिती, आत्माविष्कार आणि साभिप्रायता या गुणांनी संपन्न असली पाहिजे. के. ना. काळे, रोहिणी भाटे या कलाकोविदांनी कलेची ही लक्षणे सांगितली आहेत. आदिवासींची नृत्ये ही खरी कला नव्हे, असे सांगताना त्यात वैयक्तिक आत्माविष्कार नसतो, ती ठरीव, साचेबंद असतात, असे रोहिणी भाटे यांनी म्हटले आहे. (महाराष्ट्र जीवन खंड २ रा, पृ. ३७०-७१)

संगीत
 या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्रात संगीतकलेचा काहीसा विस्तार मराठा काळी झाला होता, इतकेच फार तर म्हणता येईल. संगीतावर आज जो सर्वमान्य ग्रंथ आहे तो म्हणजे 'संगीत रत्नाकर' हा होय. सिंघण यादवाच्या कारकीर्दीत शार्ङ्गदेव नावाच्या संगीतज्ञाने तो लिहिला. दक्षिणी व उत्तरी दोन्ही संगीतकला त्यालाच प्रमाण मानतात. त्याचाच समकालीन पार्श्वदेव याने 'संगीत समयसार' हा ग्रंथ लिहिला. हे दोन्ही ग्रंथ संस्कृत आहेत. पण यात अनेक मराठी संज्ञा आल्या असून मराठी पद्यांची उदाहरणेही दिली आहेत. रामदेवरावाच्या पदरी गोपालनायक नावाचा