पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६२२
 

'शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र' ही महाराजांच्या चरित्रावरची तिसरी महत्त्वाची बखर होय. लेखकाची शैली उत्तम आहे. पण महाराज गेल्यानंतर शंभर- सवाशे वर्षांनी ही लिहिली असल्यामुळे अनेक ठिकाणी विपर्यास झाला आहे. यानंतर महत्त्वाची बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर ही होय. कृष्णाजी शामराव या दिल्लीच्या एका गृहस्थाने ही लिहिली असून, कुंभेरीच्या वेढ्यापासून नानासाहेब पेशव्याच्या अंतापर्यंत हकीकत या बखरीत आहे. ही बखर सर्वात जास्त विश्वसनीय असून लेखकाची वर्णनशैली फार उत्कृष्ट म्हणून नावाजलेली आहे. मराठी साम्राज्याची छोटी बखर ही १८१७ साली लिहिलेली आहे. भोसल्यांचा मूळ पुरुष बाबाजीपासून प्रतापसिंहाअखेरपर्यंतची हकीकत हीत आहे. पेशव्यांची बखर ही कृष्णाजी विनायक सोहोनी यांनी लिहिली असून तीत पेशव्यांच्या कुळाचा सर्व वृत्तांत आला आहे.

इतिहास नव्हे
 या सर्व बखरींचे मराठ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व असले तरी, या बखरी म्हणजे इतिहास नव्हेत, हे ध्यानात ठेविले पाहिजे. हे सर्व लेखन पुराणांच्या धर्तीवर लिहिलेले आहे. इतिहासकाराची वस्तुनिष्ठ दृष्टी, सत्याची चिकित्सा, कार्यकारणमीमांसा यांपैकी यात काही नाही. स्थलकालनिश्रयाचा प्रयत्न नाही. कालविपर्यास भरपूर आहे आणि थोर व्यक्तींना अवतार मानण्याची पुराणवृत्ती लेखकांच्या ठायी आहे. मात्र साहित्य म्हणून त्यांना खूपच महत्त्व आहे. भाषेचा थाट, वर्णनशैली, संभाषणातील ऐट, व्यक्तिदर्शनाची हातोटी, निवेदनाची बहार, आणि विशेष म्हणजे शब्दाशब्दांतून व्यक्त होणारा स्वाभिमान ! यामुळे ऐतिहासिक काळ व त्या वेळचे वीर पुरुषांचे पराक्रम हे डोळ्यांसमोर उभे राहतात.
 बखरीखेरीज नाना फडणिसाचे आत्मचरित्र, नारायण-व्यवहार-शिक्षा, फादर स्टीफन्स याने लिहिलेली ख्रिस्त पुराणाची प्रस्तावना, अमात्यांची राजनीती, पंचतंत्राचे मराठी भाषांतर असे काही गद्य लेखन या काळात झालेले आहे. यांतील 'राजनीती' किंवा 'आज्ञापत्र' याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण राजनीतीचे विवेचन करणारा मराठीतला तो एकुलता एक ग्रंथ आहे. त्याचा परिचय मागे येऊन गेलाच आहे. नाना फडणिसांच्या आत्मचरित्राची अशीच महती आहे. कारण तशी परंपराही मराठीत नव्हती. पानपतनंतर स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन नानाने फार उत्कृष्ट केले आहे आणि जाता जाता जगाच्या रीतीचे वर्णनही केले आहे. 'नारायण- व्यवहार- शिक्षा' हा ग्रंथ बाल सवाई माधवराव याच्या शिक्षणासाठी लिहिलेला आहे. गोव्यातील ख्रिश्चन मिशनरी फादर स्टीफन्स याने 'ख्रिस्त पुराण' हा पद्य ग्रंथ लिहिला. पण त्याची प्रस्तावना गद्यात आहे. त्यात अर्थातच ख्रिश्चन धर्माची महती सांगितलेली आहे.
 मराठी गद्याचा पसारा हा एवढाच आहे. (महानुभावीय गद्याचे वर्णन मागे