पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२१
साहित्य आणि कला
 

विषयांची चिकित्सा यांनी भावमय केली आहे काय ? या विषयांना त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही.
 थोरले बाजीराव, नानासाहेब, माधवराव, रघुनाथराव, महादजी, दत्ताजी, नाना फडणीस अशा पुरुषांची उत्तम व्यक्तिरेखा, त्यांच्या गुणावगुणासकट, त्यांच्या यशापयशासकट, कोणा शाहिराने रंगविली आहे काय ? एकही नाही.
 हे सर्व कवी मनाने पुराण काळातच होते. पाप, कलियुग हीच त्यांच्या मते पराभवाची कारणे होती. ते मोठ्या माणसांना अवतारी पुरुषच मानीत. आणि भक्तांच्या चरित्रांसारखीच त्यांची चरित्रे लिहीत. वास्तवाशी, कार्यकारणाशी त्यांचा काही संबंधच नव्हता. ती चिकित्सा करण्याचे बळ त्यांच्या मनाला मुळीच नव्हते.
 अगदी शेवटच्या दिवसांत तर जो कोणो पैसा देईल त्याच्या गौरवाची कवने शाहीर रचून देत असत. आणि अशा कवनांची संख्या जवळजवळ निम्मी आहे. तेव्हा द्रष्टा, क्रांतदर्शी असली विशेषणे कोणत्याही शाहीराला लाविता येणार नाहीत. मागे सांगितलेच आहे की मराठ्यांना सर्व भारतभर सुयंत्र साम्राज्यव्यवस्था स्थापण्याचे सामर्थ्य नव्हते. अशा वेळी खरा कालवेत्ता एखादा शाहीर उदयास आला असता, (इंग्रज, पोर्तुगीज, मुसलमान यांना जाणणारा, स्वकीयांना त्यांच्या सामर्थ्यांचे रहस्य उलगडून सांगणारा) आणि राष्ट्रीय भावनेचे, हिंदुपदपातशाहीचे तत्त्वज्ञान सर्वत्र विवरून सांगण्याचे कार्य त्याने केले असते, तर त्याला द्रष्टा कवी म्हणता आले असते. दुर्दैवाने तसा शाहीर येथे कोणी झाला नाही. तसे महाकाव्य रचण्याचे सामर्थ्यच मराठी मनाला त्या काळी नव्हते.
 आख्यानकाव्य, चरित्र व लावण्या, पोवाडे यांचे विवेचन झाले. आता बखर या गद्य साहित्याचा विचार करावयाचा.

बखर वाङ्मय
 शिवपूर्व काळात महिकावतीची बखर व राक्षसतागडीची बखर अशा दोन बखरी झाल्या. त्यांत विविध प्रकार आहेत. ९६ कलमी बखर, सभासदांची बखर, सप्त प्रकरणात्मक चरित्र ही शिवछत्रपतींची चरित्रे आहेत. पेशव्यांची बखर, मराठेशाहीची बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर हे समग्र वृत्तांत आहेत. हरिवंशाची बखर, होळकरांची कैफियत अशा काही कुळांच्या बखरी आहेत. पानपतची बखर, खर्ड्याची लढाई अशी काही विशिष्ट लढायांची वर्णने आहेत.
 ९६ कलमी बखर हे पुण्यश्लोक राजा (शिवाजी) याचे चरित्र आहे. दत्ताजीपंत वाकेनवीस याजपाशी तपशिलवार यादी लिहिली होती. तीपासून खंडो आबाजी मलकरे यांनी नक्कल करून घेतली. दुसरी बखर म्हणजे सभासदाची. कृष्णाजी अनंत सभासद याने ही इ. स. १८९४ साली राजाराम महाराजांचे सांगण्यावरून लिहिली. लेखकाने सर्व घडामोडी प्रत्यक्ष पाहिल्या असल्यामुळे ही बखर विश्वसनीय समजतात.