पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१७
साहित्य आणि कला
 

वाटते. ज्याने दुष्टपणाने आपल्याला छळले, व ज्याच्या अमलात आपल्या देशावर, आपल्या लोकांवर आपल्या मुलाबाळांवर असा जुलूम झाला, अशा बादशहाला काही अद्दल घडवावी, असे दासोपंताच्या मनात देखील आले नाही व त्याने तसा यत्नही केला नाही, याबद्दल मन खट्टू होते. आणि या शांत समाधानी वृत्तीबद्दल थोडा किळसही येतो. क्षणभर असेही मनात येते की ज्यांना इहलोकाची चाडच राहिली नाही ते इहलोकी राहण्याला थोडे अयोग्यच खरे.'

चरित्र वाङ्मय
 आख्यान काव्यानंतर जुन्या मराठीतील चरित्र वाङ्मयाचा विचार करावयाचा. चरित्र लेखनपरंपरा तशी मराठीत जुनीच आहे. महीन्द्रभट याने 'लीळाचरित्र' हे चक्रधरांचे चरित्र लिहिले. नामदेवाने आदी, तीर्थावळी, समाधी असे भाग करून ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले. नामदेव, तुकाराम, निरंजनमाधव यांनी लहान मोठी आत्मचरित्रे लिहिली. सरस्वती गंगाधरांच्या 'गुरुचरित्रा'चा उल्लेख मागे आलाच आहे. बखरीत काही चरित्रे आहेत. पण ती गद्य आहेत. त्यांचा विचार तेथे करू.

महीपती
 वरील लेखकांनी एकेका पुरुषाचे चरित्र लिहिले. यापुढे अनेकांची चरित्रे लिहिणारे ग्रंथकार झाले. उद्धवचिद्घन, दासोदिगंबर आणि महीपतीबुवा ताहराबादकर हे प्रसिद्ध चरित्रकार होत. त्यातील महीपतीचे ग्रंथ हे सर्व महाराष्ट्रभर पसरले व गाजले. या लोकांनी देवादिकांची नाही, पण ज्ञानेश्वर, तुकाराम इ. साधुसंतांची चरित्रे लिहिली. ऐहिक पराक्रम करणाऱ्यांचे चरित्र त्यांनी एकही लिहिले नाही. 'भक्तविजय,' 'संत- लीलामृत', 'भक्तलीलामृत', व 'संतविजय' असे महीपतीचे चार चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते १७६२ ते १७७५ या काळात लिहिलेले आहेत. निजशांतिसुख, विवेक लाभावा, भक्तिमहिमा वाढावा, या हेतूने ही चरित्रे लिहिली, असे महीपती सांगतो.

चमत्कार प्रधान
 सध्या ज्याला आपण चरित्र म्हणतो तशी ही चरित्रे नाहीत. स्थलकालाचा निश्चय यांत नाही. तसा प्रयत्न, तशी कल्पनाही, या चरित्रकारांच्या मनात नाही. आख्यानकवी ज्याप्रमाणे स्वकालापासून अलिप्त, तसेच हे चरित्रकार अलिप्त होते. राजकीय, आर्थिक घडामोडी करणारा माणूस यांना चरित्र लिहिण्यास योग्य वाटत नाही. ते फक्त साधुसंतांची चरित्रे लिहितात. आणि त्यातही चमत्कारांना प्राधान्य असते. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांचे तत्त्वज्ञान विवरून सांगावे असा यांचा हेतू नाही. भक्तांवर संकटे आली आणि देवाने चमत्कार करून किंवा त्यांनी स्वतः चमत्कार करून ती निवारली. हे वर्णन करून भक्तांचा व भक्तीचा महिमा वर्णावा, असा या चरित्रकारांचा हेतू आहे.