पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६१६
 

 पण स्वकालाशी समरस होऊन, काही विशिष्ट उद्दिष्ट, काही ध्येय डोळ्यांपुढे ठेवून रचना करणे हे जे महाकाव्याचे प्रधान लक्षण ते जैनपंथीय मराठी काव्यांतही दिसत नाही.

स्वकालविमुख
 आख्यानकवी आणि दासोपंतापासून पुढे उल्लेखिलेले संप्रदायकवी हे पूर्णपणे स्वकालविमुख होते. महाराष्ट्रावर भयानक संकट कोसळत होती. प्रचंड संघर्ष चालू होते. पण यांनी, क्तचित काही अपवादभूत निर्देश वगळता, त्याची दखलही घेतली नाही. महाराष्ट्र समाजात अनंत घडामोडी चालू होत्या. त्याचा उत्कर्षापकर्ष चालू होता. त्यांविषयी काही सामाजिक, राजकीय, आर्थिक असा एखादा विचार घेऊन, तत्त्व घेऊन त्याला मूर्त रूप काव्यात द्यावे, असे कधी कोणास वाटले नाही. 'कविः क्रांतदर्शी', 'रवि न देखे ते कवी देखे', हे उद्गार सार्थ होतील असा एकही कवी या काळात झाला नाही. संस्कृत महाभारत वाचताना हे सर्व विशेष ध्यानात येते. स्वकालीन सर्वांगीण जीवनाविषयी त्या ग्रंथाचा कर्ता किती जागरूक होता हे पाहून, तशी जागृती एकाही मराठी कवीने दाखवू नये, याचे आश्चर्य वाटते.

वास्तवहीन
 स्वकालाच्या राजकीय किंवा सामाजिक घडामोडी सोडून दिल्या तरी इतर जे वास्तव जीवन त्याचे अवलोकन तरी या कवींनी करावे. पण तेही त्यांनी केले नाही. निसर्गाचे वर्णन करताना त्या वनात साही ऋतू एकदम अवतरले, असे ते बिनदिक्कत लिहितात. ज्याला अप्रतिम रूप नाही असा पुरुष किंवा स्त्री यांच्या काव्यात आढळणार नाही. वस्त्रालंकारांच्या बाबतीत, पक्वान्नांच्या बाबतीत सर्वत्र हेच आहे. इहलोकात जे कधी कुठे आढळत नाही ते यांच्या काव्यात सदैव हात जोडून उभे आहे.

मूल्यमापन
 दासोपंताविषयी विवेचन केल्यानंतर समारोपादाखल वि. ल. भावे यांनी जे लिहिले आहे तेच, थोड्याफार फरकाने, एकंदर वर निर्देशिलेल्या मराठी कवींविषयी खरे आहे, असे वाटते. दासोपंताचे वडील दिगंबरपंत हे नारायण पेठचे देशपांडे होते. एकदा दुष्काळ असल्यामुळे त्यांच्याकडून बादशहाकडे वेळेवर रसद पोचली नाही. तेव्हा त्याने दासोपंताला पकडून ओलीस म्हणून ठेवले आणि, रसद आली नाही तर त्याला बाटवून मुसलमान करू, अशी धमकी दिली. सुदैवाने पुढे रसद पोचली आणि दासोपंताची सुटका झाली. ह्याचा संदर्भ देऊन भावे लिहितात, दासोपंताची ही प्रचंड रचना पाहून कौतुक वाटते. पण एवढा मोठा विशाल बुद्धीचा पुरुष, सरकारी नोकरी सुटल्यानंतर, केवळ वेदांत कुटीत शांतपणे स्वस्थ राहावा, याबद्दल थोडे वाईटही