पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१३
साहित्य आणि कला
 

अभिमान होता हे प्रसिद्धच आहे, पण त्यांनीही त्यांच्याविषयी व एकंदर मराठी कवीं विषयी हेच मत दिले आहे. 'आमच्या महाराष्ट्र कवींनी सामान्यतः पाहाता अर्थव्यंजनाच्या पलीकडे थोडेच लक्ष दिलेले आढळते. अर्थ शब्दांनी व्यक्त झाला की झाले.' असे त्यांनी मोरोपंतावरील विवेचनाच्या समारोपात म्हटले आहे.

स्वतंत्र तत्त्व
 पण डॉ. वाटवे यांनी दाखविलेली उणीव ही खरी उणीव आहे. स्वतंत्र तत्व, स्वतंत्र ध्येय, स्वतंत्र विचारसरणी सांगण्यासाठी मराठी कवींनी काव्य लिहिले नाही. रघुवंश, किरातार्जुनीय, शाकुंतल, मृच्छकटिक यांसारख्या स्वतंत्र काव्यकृती मराठी कवींना साधल्या नाहीत. वरील काव्य, नाटके जगाला, पाश्चात्य जगालाही, मोह घालतात. तशी आख्यानकवितेत एकही रचना नाही.
 तरीही वर सांगितले त्याप्रमाणे मराठे व महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे. मराठी भाषेला त्यांनी संपन्न केले. आणि प्राचीन कथा मराठीत आणून प्राचीन परंपरेचे व धर्माचे रक्षण केले हे खरेच आहे. एवढे ऋण आपण मान्य केलेच पाहिजे.

संप्रदाय
 हा आख्यान कवितांचा विचार झाला. आता याच काळात महाराष्ट्रात जे भिन्नभिन्न संप्रदाय किंवा पंथ रूढ होते त्यांच्या वाङ्मयाची माहिती देऊन हे विवेचन पुरे करू. महानुभाव, नाथ, दत्त, वारकरी आणि रामदासी असे पाच पंथ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांतील महानुभाव पंथाचे विवेचन पूर्वी येऊन गेले आहे. बहामनी कालाच विचार करताना वारकरी आणि रामदासी संप्रदायांचा विचार विस्तृतपणे केला आहे. आता राहिले नाथ आणि दत्त संप्रदाय.

दत्तसंप्रदाय
 दत्तसंप्रदाय हा फार प्राचीन आहे. पुराणात त्याची वर्णने येतात. महानुभावांचे दत्त हे दैवत आहे. पण तो त्रिमूर्ती दत्त नव्हे. तो एकमुखी दत्त असून, त्याचे माहात्म्य 'सैहाद्रवर्णनात' आले आहे, हे मागे सांगितलेच आहे. 'या मार्गासि आदिकारण दत्तगुरू' असे चक्रधरानेच म्हटले असल्यामुळे महानुभाव दत्तसंप्रदायच होय, असे कोणी म्हणतात. पण महाराष्ट्रात आज जो दत्तसंप्रदाय रूढ आहे तो त्रिमुखी दत्ताचा आहे. आणि त्याचे प्रवर्तक पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेले नरसिंह सरस्वती हे होत. त्यांचा स्वतःचा एकही ग्रंथ नाही. पण मागे उल्लेखिलेला 'गुरुचरित्र' हा सरस्वती गंगाधराचा ग्रंथ तो या पंथाचा प्रमुख ग्रंथ होय. यात काय प्रतिपाद्य आहे ते मागे सांगितलेच आहे. या पंथाने हिंदुमुसलमानांचे ऐक्य करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणतात. आणि श्रीदत्त आपल्या भक्तांना मलंग