पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६१४
 

वेषात दर्शन देत असत, असे सांगतात. पण प्रत्यक्षात याची काही फलप्राप्ती झाली नाही हे उघडच आहे.

नाथपंथ
 दुसरा पंथ म्हणजे नाथसंप्रदाय हा होय. हा संप्रदाय स्वतः श्रीशंकरानेच प्रस्थापित केला आहे. आदिनाथ, मत्स्येन्द्रनाथ, गोरखनाथ, गैनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) अशी आपली परंपरा स्वतः ज्ञानेश्वरांनीच सांगितली आहे. पण ज्ञानेश्वर नाथपथी असले तरी, त्यांनी त्या संप्रदायाचे विवरण करणारे ग्रंथ लिहिले नाहीत, त्यांचे सर्व ग्रंथ वारकरी पंथाचे आहेत. त्यांच्या पूर्वीचे गोरक्षनाथ यांची काही पदे व गैनीनाथांची 'गोरक्षगीता' एवढेच त्या काळचे मराठी वाङ्मय आहे. पण नाथसंप्रदाय हा पुढे चालूच राहिला आणि त्याने मराठीला वाङ्मयही विपुल दिले. त्यापैकी दासोपंताचे वाङ्मय फार प्रसिद्ध आहे. गीतेवर त्याने चारपाच टीका लिहिल्या. त्यांपैकी 'गीतार्णव' ही टीका सव्वा लक्ष ओव्यांची आहे. याशिवाय याने सव्वा लक्ष पदेही रचली आहेत. 'गीतार्णव' हा ग्रंथ इतका व्यापक आहे की त्यात अमुक विषय आल नाही असे नाही. पण दासोपंताचे वाङ्मय हे नाथपंथाचे विवरण करीत नाही. तो नाथपंथी होता हे खरे. आणि हठयोग व एकांतिक गुरुभक्ती यांचे वर्णन तो ग्रंथात करतो. पण मुख्य विजय तो नाही. त्याच्या नंतर झालेला नाथपंथी म्हणजे सत्यामलनाथ हा होय. त्याचा 'सिद्धान्तरहस्य' हा ग्रंथ होय. गैनीनाथ, गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ व शिवदिननाथ अशी ही शिष्यपरंपरा आहे. यातील शिवदिननाथ किंवा 'शिवदिन केसरी' हा विशेष प्रसिद्ध आहे. याने 'विवेक दर्पण', 'ज्ञानप्रदीप' वगैरे ग्रंथ रचले. इ. स. १६९८ ते १७७४ हा याचा काल होय. परंपरेतल्या इतर लोकांनी पदे, अभंग वगैरे रचना केली. मोठा ग्रंथ असा रचला नाही.

जैन मराठी काव्य
 दत्तसंप्रदाय व नाथपंथ यांच्याप्रमाणेच जैन पंथीय मराठी साहित्याचाही विचार करणे अवश्य आहे. मराठीत याचा अभ्यास पूर्वी फारसा झालेला नाही. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात याचा विचार फारसा कोणी करीत नाही. पण तो केला पाहिजे इतके ते साहित्य विपुल आहे आणि महाराष्ट्रात राहणारे जैन हे महाराष्ट्राचा व मराठीचा इतरांइतकाच अभिमान धरतात, हे फार महत्त्वाचे कारण आहे. जैनांच्या 'तीर्थकल्पा'त सातवाहन राजाची कथा येते आणि तेथे पैठणचा 'महाराष्ट्र लक्ष्मीचे रत्न' असा उल्लेख आलेला आहे.
 ब्रह्मजिनदास हा पंधराव्या शतकातील प्रसिद्ध गुजराथी साहित्यिक होय. त्याने आपल्या शिष्यांना मराठीत लेखन करण्याची प्रेरणा दिली. त्याने स्वतः मराठीत 'श्रेणिक चरित्र' हा ग्रंथ लिहिला आहे. शिशुनाग वंशातील श्रेणिक- बिंबिसार- यांचे