पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६११
 

 संस्कृतातले सर्व आख्यानभांडार राम, कृष्ण, पांडव या वीरपुरुषांची स्फूर्ति दायक चरित्रे, पुराणातील हरिश्चंद्र, ध्रुव, अंबरीष, इ. आदर्श राजपुरुष, सीता, सावित्री, दमयंती, अनसूया यांच्या अनमोल कथा मराठीत आणून या आख्यानकवींनी मराठीला व महाराष्ट्राला कायमचे ऋणी करून ठेविले, याविषयी दुमत नाही. पण ऐतिहासिक दृष्टीने यांचे मूल्यमापन करून त्याचे स्थान ठरविणे हे अवश्य आहे.

महाकवी
 'प्राचीन मराठी पंडित काव्य' या नावाचा एक ग्रंथ डॉ. के. ना. वाटवे यांनी लिहिला आहे. त्यात मोरोपंतांविषयीचे आपले मत मांडले आहे. त्यांच्या काव्याचे सर्व गुणवर्णन वाटवे यांनी केले आहे. पण ते महाकवी होते काय या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, 'संस्कृतातील माघ, भारवी, श्रीहर्ष, इ. विदग्ध कवींप्रमाणे, पंतांनी महाभारताचा एखादा सुटा कथाभाग घेऊन, त्यावर स्वतःची कलाकुसर केली असती, पांडित्य, कलात्मकता आणली असती, त्या कथेतून फलित होणारे विशिष्ट तत्त्व दर्शविले असते, आणि त्या स्वयंपूर्ण कथेवर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वकालाच ठसा उमटविला असता, तर त्यांचे 'आर्याभारत' हे महाकाव्य झाले असते. पंतांनी काही ठिकाणी स्वतःच्या उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी घातल्या आहेत; पण एवढ्याने काम भागण्यासारखे नाही. आर्ष महाकाव्याचे जुने कथानक नव्या संस्कृतीच्या, विद्याकलांच्या आणि विशिष्ट हेतूंच्या चौकटीत बसवावे, तेव्हाच ते विदग्ध महाकाव्य होते, एरवी नाही. त्यामुळे मुक्तेश्वरांच्या संक्षेप रामायणाप्रमाणे किंवा त्यांच्या भारताप्रमाणे, 'आर्याभारत' हेही महाकाव्य नाही.'
 असेच मत ग्रंथाच्या शेवटी उपसंहारात एकंदर सर्व पंडित कवींविषयी त्यांनी मांडले आहे. काही तरी तत्त्व, काही ध्येयवाद कवीच्या मनापुढे असला पाहिजे; तो व्यक्त करण्यासाठी त्याने काव्यरचना केली तरच ते महाकाव्य होते. 'राजधर्म हा त्यागधर्म आहे' हे तत्त्व कालिदासाने 'रघुवंशा'त मूर्त केले आहे. भारवीने 'किरातार्जुनीया'तून एक नवा अर्थ काढला. संन्यासवृत्तीची मरगळ त्या वेळी समाजाला आली होती. ती मोडून काढून, अर्जुनाच्या तोंडून कवीने कणखर प्रवृत्तीची चढाई दाखविली. श्रीहर्षाने 'नैषधीयचरिता'त जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यांतील कलहाचा घातकपणा सूचित केला. अशा तऱ्हेचा ध्येयवाद आणि स्वकालसमरसता पंडिती काव्यात प्रायः आढळून येत नाही. जुन्या कथांचा नवीन अर्थ ते सांगत नाहीत. विशिष्ट विचारसरणीचा पाठपुरावा ते करीत नाहीत. थोडक्यात म्हणजे ज्याला महाकाव्याचा विशिष्ट हेतू म्हणतात तो कुठेही दिसत नाही. मोरोपंत आणि वामन यांनी जे काही चांगले लिहिले आहे त्याची पूर्ण जाणीव बाळगून असे सांगावेसे वाटते की यांना संस्कृत महाकवींची बरोबरी नाही. डॉ. वाळिंबे यांनीही, पंडिती कवींचा अभिजातवाद हा बेगडी अभिजात वाद आहे, असे म्हटले आहे. विष्णुशास्त्री यांना मोरोपंतांचा फार