पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६०८
 

म्हटले असले तरी, प्राचीन थोर पुरुषांच्या कथा वर्णून त्यांनी मराठ्यांचे मन खंबीर व दृढ करून टाकले, यात शंका नाही. याच काळात महीपतीसारखे चरित्रकार उदयास आले आणि संतांची चरित्रे लिहून त्यांनीही धर्मजागृतीचे कार्य केले. यानंतर विचार करावयाचा तो शाहिरांचा. त्यांचे महत्त्व इतके आहे की त्यांचा काळ म्हणजेच 'मराठी काव्याची प्रभात' होय असे कोणी म्हणतात. हे झाले काव्याविषयी. पण याच काळात गद्य बखरवाङ्मयही लिहिले जात होते आणि मराठी मनाच्या घडणीच्या दृष्टीने या वाङ्मयाचेही तसेच महत्त्व आहे. शाहीर आणि बखरकार यांनी ऐहिक जीवनाकडे लक्ष देऊन स्वकालीन घडामोडींवर रचना केली हा त्यांचा विशेष होय. अशा रीतीने मराठा कालखंडातील साहित्याचा विचार करताना आख्यानकवी, चरित्रकार, शाहीर व बखरकार अशा चार प्रकारच्या साहित्यिकांचा आपल्याला विचार करावयाचा आहे.
 हा विचार संस्कृतीचे साहित्य एक अंग म्हणून करावयाचा आहे. मराठ्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा त्याच दृष्टीने आपण विचार केला. त्यांचा इतिहास देणे हा आपला हेतू नव्हता. तेच धोरण येथे आहे. काही प्रमुख साहित्यिकांच्या महत्त्वाच्या कृतींचा येथे संस्कृतीच्या दृष्टीने परामर्श घ्यावयाचा आहे. आणि त्याच दृष्टीने त्यांचे महत्त्वमापन करावयाचे आहे.

आख्यानकवी
 प्रथम आख्यानकवींचा विचार करू. त्यांतील पहिला मोठा कवी म्हणजे मुक्तेश्वर हा होय. हा एकनाथांच्या मुलीचा मुलगा. म्हणजे सतराव्या शतकाचा प्रारंभ हा याचा काळ होय. याची मुख्य ख्याती आहे ती महाभारत रचनेसाठी. मराठीतला सर्वश्रेष्ठ कवी, असे याच्या संबंधी, हरिभाऊ आपटे, कृष्णशास्त्री चिपळूणकर अशांसारख्या पंडितांनी म्हटलेले आहे. याने महाभारत मराठीत आणले. पण त्याची आदी, सभा, वन, विराट व सौप्तिक पर्व अशी पाचच पर्वे उपलब्ध आहेत. वि. ल. भावे यांच्या मते यातील आदिपर्व हे खरे श्रेष्ठ काव्य होय. आदिपर्व ही पौर्णिमा असून पुढे वद्य पक्ष लागतो, असे ते म्हणतात. काव्यसौंदर्याचे बहुतेक सर्व गुण याच्या काव्यात दिसून येतात. मनोविकारांची वर्णने, सृष्टीची वर्णने, युद्धांची वर्णने, शृंगार, वीर, करुणादी रस हे काव्यसौंदर्य याच्या भारतात कोठे कोठे उत्कटत्वाने दिसते. सभा पर्वातील द्रौपदीचा संताप, विराटपर्वातील कीचकाची मदोन्मत्तता, वन पर्वातील नलदमयंती विरह, शकुंतला, भीम, अर्जुन, सावित्री ही व्यक्तिचित्रे, यांची वर्णने विशेष उल्लेखनीय आहेत.

मुक्तेश्वर
 मुक्तेश्वर हा विद्वान कवी होता. परिणामवाद, विवर्तवाद, जीवेश्वरवाद, मीमांसाशास्त्र यांविषयीही तो काव्यात प्रसंगविशेषी चर्चा करतो. पण त्याच्या काव्याचे महत्त्व