पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


३२.
साहित्य आणि कला
 



साहित्यमहिमा
 साहित्य हे मानवी संस्कृतीचे, धर्म, समाजरचनेची तत्त्वे, अर्थव्यवस्था यांइतकेच महत्त्वाचे अंग आहे, यात वाद नाही. 'जे न देखे रवी, ते देखे कवी,' असा कवीचा गौरव केलेला आहे. 'कविः क्रांतदर्शी-' असेही त्याच्याविषयीचे वचन प्रसिद्ध आहे. ही वचने अगदी सार्थ आहेत हे, रामायण व महाभारत ही दोन संस्कृत महाकाव्ये पाहिली असता, सहज ध्यानात येईल. भारतीय मनाला वळण लावण्याचे, त्याला स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे महाकार्य आज हजारो वर्षे हे दोन ग्रंथ करीत आहेत.

मराठी साहित्य
 मराठीच्या दृष्टीने पाहिले तर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास यांनी मराठी मन कसे घडविले हे आपण पाहिलेच आहे. मुस्लिम आक्रमणाच्या काळात यांच्यामुळेच हिंदूंची स्वधर्मनिष्ठा जिवंत राहिली, असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. पण या संत कवींनी मुख्यतः आध्यात्मिक, तात्त्विक विवेचनपर ग्रंथ लिहिले. आत्मा, परमात्मा, मोक्ष, कर्म, पुनर्जन्म ही जी वेदांतातील तत्त्वे, त्यांच्या विवेचनावर त्यांचा भर होता. त्यांच्यानंतरच्या काळात मराठीत आख्यानकवी निर्माण झाले. मुक्तेश्वर, वामन, श्रीधर, मोरोपंत ही नावे प्रसिद्धच आहेत. त्यांनी रामायण, महाभारत व पुराणे यातील राम, कृष्ण, हरिचंद्र, ध्रुव यांच्या कथा मराठीत आणून व महापुरुषांचे आदर्श मराठी मनापुढे उभे करून त्याला नानाप्रकारच्या प्रेरणा दिल्या. काव्य लिहिताना 'आम्ही हे तरून जाण्यासाठीच लिहीत आहो,' असे त्यांनी