पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०९
साहित्य आणि कला
 

आहे ते त्यातील काव्यगुणांसाठी. भाषाप्रभुत्व, रचनाचातुर्य, प्रसाद, माधुर्य, अर्थ- गांभीर्य, उदात्त कल्पना या गुणांनी मराठी काव्याला त्याने सौंदर्य प्राप्त करून दिले आणि मराठी भाषेला अभिमानास्पद अशी देणगी दिली.

वामन पंडित
 आख्यानकवीत काही कवी न्यायवेदान्तमीमांसादी शास्त्रांत पारंगत होते. त्यांना पंडित कवी म्हणत. संस्कृत महाकाव्याचे आदर्श पुढे ठेवून ते मराठीत रचना करीत अशा कवींत वामनपंडित हा अग्रणी होय. इ. स. १६३६ ते १६९५ असा त्याचा काळ मानला जातो. वामनपंडिताने शास्त्रीय विषयांवर ग्रंथरचना केली आहे आणि काव्यही लिहिले आहे. 'निगमसार' 'कर्मतत्त्व,' 'समश्लोकी गीता' आणि 'यथार्थदीपिका' इ. याचे तात्त्विक ग्रंथ होत. त्यांतील 'यथार्थदीपिका' हा फार प्रसिद्ध आहे. ती गीतेवर टीका आहे. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असे ज्ञानेश्वरांनी प्रतिपादन केले आहे. ते वामनाला मान्य नाही म्हणून त्यावर आणि इतरही ज्ञानेश्वरांच्या मतांवर त्याने या दीपिकेत टीका केली आहे. पण वामन आज लोकांत प्रसिद्ध आहे तो त्याच्या कथाकाव्यामुळे. त्याने रामायण, महाभारत किंवा भागवत यांवर स्वतंत्रपणे मोठी अशी ग्रंथरचना केलेली नाही. प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या क्रीडा हा त्याचा विषय आहे. 'वनसुधा', 'वेणुसुधा', 'राधाविलास', 'कात्यायनी व्रत', 'उखळी बंधन', 'राधाभुजंग' ही त्याची प्रकरणे प्रसिद्ध आहेत. रामायणातील 'भरतभाव' आणि 'सीतास्वयंवर' हीही प्रकरणे उत्तम आहेत. भावमधुर कोमल रचना, उत्तम प्रत्ययकारी वर्णने, शब्दचित्रे, रसाविष्कार, मनोहर नादमधुर भाषा हे त्याच्या काव्याचे विशेष गुण आहेत. एकनाथांप्रमाणेच वामन हा विषयाला अध्यात्मरंग देतो. वसुदेवाने हरीला यशोदेपुढे ठेवले व तिची मुलगी आणली म्हणजे प्रत्यक्ष मायाच आणली. त्यामुळेच तो मग बद्ध झाला. रामाने शिवधनुर्भंग केला म्हणजे संसाराचाच भंग केला. वधू आणि वर म्हणजे शांती आणि आत्मा होत. अशी वर्णने हा करतो.
 जगन्नाथ पंडिताच्या गंगालहरीचे आणि भर्तृहरीच्या शतकांचे वामनाने भाषांतर केले आहे. तेही अनेकांच्या वाचनात असते. पंडित कवींना यमकाची हौस फार. त्याला वामनही अपवाद नाही. म्हणूनच त्याला यमक्या 'वामन' असे नाव पडले आहे. पंडित कवी कोठे कोठे अत्यंत अश्लील लिहितात आणि ते सर्व हरी म्हणजे परमात्मा आणि राधा म्हणजे माया अशा वर्णनाने पचविण्याचा प्रयत्य करतात, पण हे अश्लाघ्य आहे असे वाटते. वामनाने काही ठिकाणी याचा अतिरेक केला अहो

रघुनाथ पंडित
 वामनानंतर रघुनाथपंडित हा कवी येतो. अठराव्या शतकाच्या प्रारंभी हा होऊन गेला. 'नलदमयंतीस्वयंवराख्यान' हे याचे सुप्रसिद्ध काव्य होय. काहींच्या मते
 ३९