पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०३
मराठेशाहीचा अंत
 

शिपाई पेंढारी बनले आणि पंजाबपासून आंध्र, तेलंगण येथपर्यंत ते सर्वत्र जाळपोळ विध्वंस, लूट करू लागले. सर्व मराठ्यांनी त्यांच्याशी जवळचे, आपुलकीचे नाते ठेवले होते. इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांचा उपयोग होईल, असे त्यांना वाटत होते. पण हा भ्रम होता. पैसा, लूट एवढेच पेंढारी जाणत होते. कसल्याही निष्ठा त्यांना नव्हत्या. त्यामुळे हिंदुस्थानावर ते एक संकट आले होते. १८१७ ते १८१८ या वर्ष तीन चार इंग्रज सेनापतींनी त्यांची काेंडी करून त्यांचा नाश केला. तेव्हा सर्वांना हायसे वाटले. कारण या वेळी आधीच हिंदुस्थानात सर्वत्र अराजक माजले होते. त्यात पेंढाऱ्यांची ची भर. त्यामुळे सर्वांना त्राही भगवान, असे झाले होते. इंग्रजांचे राज्य सर्व हिंदुस्थानातील प्रजाजनांनी सुखाने का स्वीकारले ते यावरून कळून येईल.
 गायकवाड, भोसले, होळकर व शिंदे, यांच्या कर्तृत्वाचा, १८०५ ते १८१८ या काळातल्या मराठेशाहीच्या संरणाच्या दृष्टीने, आणि मराठ्यांच्या राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने येथवर विचार केला. आता या सर्वांचा नायक जो बाजीराव त्याचा विचार करून हे प्रकरण संपवू.

मराठ्यांची नीती
 इंग्रजांनी सर्वांचा आटोप केला असल्यामुळे मराठ्यांना आता मुलूखगिरी हा उद्योग करणे शक्य नव्हते. मग त्यांनी काय करावयाचे ? नाचरंग, विलास याला पैसा कोटून आणावयाचा ? स्वतःचे सरंजामदार आणि स्वतःचे प्रजानन यांना लुटावयाचे, एवढाच उद्योग त्यांना शक्य होता. तो त्यांनी आरंभिला. प्रतिनिधी हा बाजीरावाचा सरदार. तो अत्यंत दुर्वृत्त व नादान होता. आपल्याच मुलखात तो दंगे दरोडे करू लागला. रमा तेलीण ही त्याची रक्षा होती. तिच्या नादाने तो वागत असे. त्याच्या बायका भीतीने त्याच्यापासून पळून गेल्या. या प्रतिनीधीचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीरावाने बापू गोखले यास पाठविले. त्याने चालून जाऊन प्रतिनिधीस कैद केले. तेंव्हा बाजीरावाने त्याचा सरंजाम गोखले यास दिला. पण मग त्यानेही प्रजेस नागवून अपार द्रव्यसंचय केला ! प्रजासुखे सुखं राज्ञः । असा भारतीय प्राचीन राजनीतीचा दंडक होता. आता प्रजेला नागविणे हाच मराठ्यांचा धर्म झाला.

हस्तक्षेप
 प्रतिनिधीचा बंदोवस्त झाल्यावर पटवर्धन, रास्ते, निमोणकर, पानसे यांचे सरंजाम बाजीराव लुटू लागला. त्रिंबकजी डेंगळे हा या वेळी बाजीरावाचा प्रमुख कारभारी होता. प्रथम तो हुजऱ्या होता. पण हळूहळू चढत जाऊन तो कारभारी झाला. त्याच्याच सल्ल्याने बाजीरावाने हा उद्योग सुरू केला होता. इंग्रजांची तैनाती फौज नसती तर, पटवर्धन, पानसे या सरदारांनी बाजीरावास पदच्युतच केले असते. पण ती असल्यामुळे त्यांचा काही इलाज चालेना. शेवटी पुण्याचा रेसिडेंट एल्फिन्स्टन