पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६०२
 

टिकली नाही. प्राणार्पण करूनही रक्षण करण्याजोगे काही आहे, स्वातंत्र्य, धर्म ही अशी काही मूल्ये आहेत, हा भाव पुढे मराठेशाहीत राहिलाच नाही. स्वार्थ, दौलत, शाश्वती, सुरक्षितता यांकडे सर्वांचे लक्ष. अमीरखानही याला अपवाद नव्हता. त्याने टोक्याची जहागीर इंग्रजांकडून घेऊन पुढची तरतूद करून ठेवली आणि होळकरांना वाऱ्यावर सोडून दिले. दोलतरावाने हेच केले, मग अमीरखानाला कशाला नावे ठेवावयाची ?

एलफिन्स्टनचे मत
 वरील महीदपूरच्या लढाईत इंग्रजांनी होळकरांचा पराभव केल्यावर इंग्रजांशी पुन्हा म्हणून युद्धप्रसंग आणावयाचा नाही असा दौलतराव शिंदे यांनी दृढ निश्चय केला ! त्या आधी त्याला मोठा हुरूप होता. १८१४-१८१५ हे वर्ष मराठ्यांना फार अनुकूल होते. इंग्रज युरोपात नेपोलियनकडे गुंतले होते. आणि हिंदुस्थानात त्यांचे नेपाळशी युद्ध चालू होते. तेथे त्यांचा सारखा पराभव होत होता. त्या वेळी शिंद्याने नेपाळच्या राजास पत्र पाठवून, 'दोघे मिळून इंग्रजांचा काटा काढू' असे बोलणे चालविले होते. हेच पत्र इंग्रजांनी पकडून, काही भाष्य न करता त्याच्याच हवाली केले. 'या वेळी मराठ्यांनी जोर केला असता तर आमचे काही चालले नसते,' असे एलफिन्स्टननेच लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, 'बाजीरावाच्या नेभळट स्वभावामुळे मराठे यशस्वी झाले नाहीत. फौजा, पैसा, शस्त्रास्त्रे, दारूगोळा, इ. सिद्धता त्यांच्याकडे या वेळी होती. पण दक्षिणेत बाजीरावाने व उत्तरेत शिंद्याने हिंमत दाखवली नाही. उलट त्यांनी राष्ट्रद्रोह केला, असे म्हणावे लागते.' हा उतारा देऊन सरदेसायांनी म्हटले आहे, 'थोडीशी दूरदृष्टी किंवा स्फूर्ती दौलतरावाच्या अंगी असती तर, समान धर्माच्या रजपुतांस जोडून घेऊन, इंग्रजांशी सामना देण्याचे सामर्थ्य त्यास आले असते. पण त्याने काही केले नाही. तो अनुभवाने काही एक शिकला नाही आणि पूर्वीचे नाद त्याने सोडले नाहीत.' (मराठी रियासत, उत्तर विभाग ३, पृ. ४३३, ४३४). दौलतरावास पतंग उडविण्याचा नाद होता. सरदेसायांनी म्हटले आहे, पतंगाच्या अल्पांशाने जरी त्याने राज्यकारभाराकडे लक्ष दिले असते, तरी कार्य झाले असते. पण पतंग, शिकार, नाचरंग, विलास यांतच त्याचे सर्व लक्ष होते. आणि केलाच उद्योग तर होळकर, रजपूत यांना लुटणे हा करावयाचा, असा त्याचा निश्रय होता.

पेंढारी
 तैनाती फौजेने रक्षण करावयाचे असे ठरल्यामुळे, सर्व मराठे सरदार हळूहळू नाच- रंग, विलास यांत मग्न होऊन गेले. पण यातूनच एक नवीन प्रकरण उद्भवले. ते म्हणजे पेंढारी. तसे पेंढार प्रारंभापासून मराठा लष्करावरोवर असे. पण आता शिंदे, गायकवाड, भोसले, होळकर यांना सैन्य कमी करावे लागले. त्यामुळे बेकार झालेले