पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६०४
 

याकडे त्यांनी तक्रारी केल्या. अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करावयाचा नाही अना इंग्रजांचा दण्डक होता. पण एल्फिन्स्टनने तो मानला नाही. कारण बाजीरावाच्या छळाचा अतिरेक झाला होता. तेव्हा पंढरपुरास सर्व सरदार व बाजीराव यास जमवून, त्याने १८१२ साली त्यांच्यांत नवा तह घडवून आणला आणि बाजीरावाचा सरंजामदारांवरचा सर्व हक्क साफ नाहीसा केला. पुढे १८१७ साली शिंदे, भोसले इ. मोठ्या सरदारांवरचा पेशव्याचा हक्क इंग्रजांनी असाच नाहीसा केला व त्यास एकाकी करून टाकले.

इंग्रजांचे निशाण
 १८१४-१५ हे साल इंग्रजांस कठीण होते, हे वर सांगितलेच आहे. या वेळपर्यंत त्रिंबकजी डेंगळे हा बाजीरावाच्या कारभारात प्रमुख झाला होता. एलफिन्स्टनकडे जा ये तोच करीत असे. तेथे तो फार ताठ्याने वागे. आणि परत येऊन, इंग्रजांत काही अर्थ नाही, मी तुम्हांस पूर्वीचे वैभव प्राप्त करून देतो, असे बाजीरावास सांगे आणि त्याला ते खरे वाटे. या वेळेपासूनच त्याने सैन्याची जमवाजमव करण्यास प्रारंभ केला आणि पेंढाऱ्यांशीही संधान बांधले. त्यांच्या व बाजीरावाच्या भेटीही घडविल्या. आणि याच संधीत, त्याने १८१५ च्या जुलैमध्ये गायकवाडांचा वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन याचा खून करविला. त्रिंबकजीला उखडण्याची संधीच एल्फिन्स्टन पाहात होता. त्याने बाजीरावास दरडावले की त्रिंबकजीस आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आम्ही वाड्यावर चाल करू. बाजीरावाचा नाइलाज झाला. शेवटी त्याला त्रिंबकजीला इंग्रजांच्या स्वाधीन करावे लागले. त्यांनी त्याला तुरुंगात ठेवले. पण तेथून तो वर्षभराने निसटला आणि बाजीरावाला गुप्तपणे भेटून युद्धाची तयारी करू लागला. ५-११-१८१७ रोजी खडकीस लढाई झाली, बाजीराव लढाईस कधीच जात नसे. तो पर्वतीवर होता. तेथून तो पळाला. तेव्हा बारा दिवसांनी १७-११-१८१७ रोजी पुणे व शनिवारवाडा ताब्यात घेऊन इंग्रजांनी बाळाजीपंत नातू याच्या हस्ते शनिवार- वाडयावर इंग्रजांचे निशाण लावले !

पेशवाईचा अस्त
 बाजीराव पळाला, त्याच्या पाठलागावर असताना कोरेगाव येथे त्याची इंग्रजांशी दुसरी लढाई झाली (१ जाने. १८१८) . तेथूनही तो पळाला. तेव्हा अष्टीला २०-२-१८१८ रोजी तिसरी लढाई झाली. तीत बापू गोखले पडला. शेवटी बाजीरावाला धूळकोट येथे इंग्रजांनी २-६-१८१८ रोजी पकडले. त्याने शरणागती पतकरली. तेव्हा त्याचे राज्य खालसा करून इंग्रजांनी त्याला ब्रह्मावर्तास नेऊन ठेवले. तेथे तो १८५१ साली मृत्यू पावला.
 पेशवाईचा उदय कसा झाला ते आपण मागे पाहिले. आता तिच्या अस्ताचा