पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०१
मराठेशाहीचा अंत
 

गफूरखान, रामदीन यांना आताच सोक्षमोक्ष करावा, असे वाटत असल्यामुळे त्यांना हे पसंत पडले नाही व त्यांनी तुळसाबाईचा खून करून तिचे प्रेत नदीत फेकून दिले. तेव्हा इंग्रजांचा होळकरांवर चाल करण्याचा निश्चय झाला. प्रथम त्यांनी एक मोठी गोष्ट केली. ती म्हणजे होळकरांचा प्रमुख सरदार, त्यांचा आधारस्तंभ, अमीरखान यास फितविले व टोके ही जहागीर घेऊन तोही स्वस्थ बसला. मग मालकम आणि हिस्लॉप यांनी क्षिप्रेच्या काठी होळकरी फौजेवर हल्ला चढवून तिचा महीदपूर येथे पराभव केला. आणि नंतर मल्हाररावाची आई व तात्या जोग यांना पुढे करून मंदसोर येथे त्यांच्याशी तह केला. तहात तैनाती फौजेची अट होतीच. इंग्रजांचा ताबा मल्हाररावाने कबूल करावा, अमीरखानाशी स्वतंत्र तह केल्यामुळे त्यास काढून लावावे, अशा आणखी अटी होत्या. ६ जानेवारी १८१८ रोजी तहावर सह्या झाल्या आणि होळकरांचे राज्य संपुष्टात आले. या वेळी रजपूत राजांनीही स्वतंत्रपणे इंग्रजांशी तह करून आपापली व्यवस्था लावून घेतली. त्यामुळे शिंदे व होळकर यांचा त्यांच्यावरील हक्क साफ बुडाला.
 या वेळी दौलतराव शिंदे याने होळकरास मदत केली असती तर ? १८१५ साली यशवंतराव होळकराची स्त्री मैनाबाई ही स्वतः होळकरांचा कारभार पाहात होती. तिने दौलतरावाशी चढावाचा व बचावाचा गुप्त तह केला होता. पेशव्याशी एकनिष्ठ राहून इंग्रजांविरुद्ध लढा करावयाचा, असा त्याचा आशय होता. पण दौलतरावास होळकरांची सर्व दौलत गिळकृत करावयाची होती. त्यामुळे त्याने त्या तहाप्रमाणे मुळीच वर्तन केले नाही !

विश्वास कोणावर ?
 अमीरखान हा होळकरांचा अनेक वर्षांचा एकनिष्ठ सरदार. पण त्यानेही आयत्या वेळी दगा दिला. का ? त्याला वाटे, युद्धात पराभव झाल्यावर पुढे काय ? आपल्याला शाश्वती कशाची? ही चिंता मराठेशाहीच्या आरंभापासून प्रत्येक सरदाराला वाटे. छत्रपती शाहू यांनी अनेक सरदारांना वतनाच्या सनदा दिल्या होत्या. पण त्या सनदांवर ते सरदार निजामाचा महीशिक्का घेत. तो मिळाल्यावर त्यांना शाश्वती वाटे. निश्चितता येई. खुद्द मल्हारराव होळकर याने माळव्यातील पेशव्याकडून मिळालेल्या सनदांवर, दिल्लीच्या बादशहाचा सहीशिक्का घेतला होता. अनेक सरदारांची आरंभापासून शेवटपर्यंत हीच वृत्ती होती. निजाम, दिल्लीचा पातशहा–ते दुबळे झाल्यावरही-यांवर त्यांचा विश्वास जास्त, छत्रपती किंवा पेशवे यांवर कमी. त्यांच्या सनदांविषयी शाश्वती नाही, निजाम, बादशहा, यांच्याविषयी आहे. आता तोच भाव त्यांच्या मनात इंग्रजांविषयी दसपट जास्त बळकटीने निर्माण झाला होता. काय वाटेल ते होवो, मराठीशाहीचे रक्षण करावयाचे, असा भाव कोणाच्याच मनात नव्हता. प्रारंभी शिवछत्रपतींनी अशी थोडी निष्ठा निर्माण केली होती. पण पुढे ती