पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
३६
 

ही दाट छाया होय ! आता व्युत्पत्तीच्या साधनाने आणखी अनेक शब्द कानडीपासून आले असे दाखविता येईल; पण जोशी यांच्या इतर व्युत्पत्तींप्रमाणेच याही मनोरंजक ठरतील. पुलकेशी हा संस्कृत शब्द पुल म्हणजे मोठा व केशी म्हणजे सिंह. पण जोशी कुपुली या कानडी शब्दापासून तो साधू पहातात. वसिष्टी पुत्र पुलुमायी किंवा पुलुमावी हा सातवाहन राजा. त्याच्या नावातील पुलुमायी शब्द हाही पुली ( वाघ ) यापासूनच झाला असे जोशी म्हणतात. पण पुलोमारी -( इन्द्र ) याचा तो अपभ्रंश असणे अगदी शक्य आहे. तेव्हा व्युत्पत्तीची जादूगिरी करून एखाद्या राष्ट्राच्या वा समाजाच्या नावासंबंधी, कर्तृत्वासंबंधी, मूलस्थानासंबंधी काही सिद्धान्त काढणे फार धोक्याचे आहे हे आपण ध्यानात ठेविले पाहिजे.
 मरहट्ट म्हणजे झाडीमंडळ, तेच वऱ्हाड आणि तोच मूळ महाराष्ट्र, खानदेश हा मूळ कण्ण देश म्हणजेच कानड देश; राष्ट्रिक हे नाडव या कानडी शब्दाचे भाषांतर; ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे इ. विधाने मांडून इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र हा भावार्थाने कन्नड देशच होता असे मत जोशी यांनी आग्रहाने मांडले आहे. या दोन प्रदेशांतील देवतांचे साम्य दाखवून हाच निष्कर्ष त्यांनी काढला आहे; आणि शेवटी कन्नड व मराठे हे मूळचे जुळे बंधू आहेत असे उदार विधान केले आहे. डॉ. सालेटोर या पंडितानेही जवळजवळ असेच मत मांडले आहे. गोदावरीच्या परिसरात राष्ट्रकूटांच्या काळी कानडी संस्कृती व भाषा यांचे वर्चस्व होते व मराठी- कानडी अशी एक मिश्र बोली तेव्हा तेथे बोलली जात असे, असे ' यादव आणि त्यांचा काळ ' या आपल्या ग्रंथात ते म्हणतात.
 याउलट, श्रवणबेळगोळ या म्हैसूरजवळील गावी गोमटेश्वराचा जो पुतळा आहे त्याच्या खाली ' श्री चावुंडराये करवियले ' असा मराठी शिलालेख आहे, त्यावरून म्हैसूरपर्यंतचा भाग दहाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होता असे मत एका संशोधकाने मांडले आहे.

तीन महाराष्ट्रके
 पण एवढ्यावरच हे भागले नाही. शंकर रामचंद्र शेंडे यांनी ऐहोळे येथील बदामीच्या चालुक्यांच्या काळचा, इ. स ६३४ सालचा सत्याश्रय पुलकेशीच्या प्रशस्तीपर, असा रविकीर्तीचा जो शिलालेख आहे त्यातील अगमदधिपत्वम् । इ. ज्या श्लोकाचा वर निर्देश केला आहे त्याच्या आधारे त्या काळी म्हैसूर, गुजराथ, माळवा, राजस्थान या प्रदेशांचाही महाराष्ट्रात समावेश होत असे असे प्रतिपादन केले आहे ( भांडारकर ओ. रि. इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, 'दि एक्स्टेंट ऑफ महाराष्ट्र ', पृ. ४९४ ). रविकीर्तीच्या या प्रशस्तिकाव्यात, श्लोक १८ ते २२ यांत सत्याश्रय पुलकेशी याने गंग, वनवासी, लाट, मालव, गुर्जरदेश इ. प्रदेश जिंकले असे सांगून त्यानंतर पुढील तीन श्लोकांत त्याची स्तुती गाताना ९९००० ग्रामे