पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३५
अस्मितेचा उदय
 

लावणे शक्य नाही. आणि असे मोजमाप त्याकाळी असंभव होते, असे जोशी म्हणतात. मोठेपणाची कल्पना मोजमाप करूनच येते, अन्य मार्गाने नाही असा हा युक्तिवाद आहे. महानदी हे नदीला पडलेले नाव भारतातल्या सर्व नद्यांची मोजमापे घेऊन नंतर दिले गेले, असे जोशी यांचे मत असावे !

पत्ती-हट्टी
 हाटकेश्वर यात हाटक हा सोने या अर्थाचा संस्कृत शब्द आहे. हट् = प्रकाशणे या धातूपासून तो साधला आहे. पण जोशी यांनी त्याचा हट्टी शब्दाशी संबंध जोडला आहे; व हड्डी-हाटक-जनांचा ईश्वर तो हाटकेश्वर असा समास सोडविला आहे. वऱ्हाडचे म्हणजेच मूळ महाराष्ट्राचे रहिवासी तेच हे हट्टीजन. यांच्यावरूनच मरहट्टे हे नाव पडले. म. म. मिराशी यांनी जोशी यांच्या एतद्विषयक सर्व मतांचे खंडन केले आहे (नवभारत, डिसें. १९५३ ). ते म्हणतात, वऱ्हाडातील धनगर समाजाचे हट किंवा हट्टी हे नाव कोणत्याही प्राचीन कोरीव लेखात आढळत नाही. नाशिक, कारले भाजे, कान्हेरी इ. ठिकाणच्या कोरीव लेखांत अनेक जातींची नावे आली आहेत. पण हट किंवा हट्टी हे नाव नाही. त्यांच्यावरून देशाला नाव पडण्याइतके त्यांना महत्त्व असते तर त्यांचा नामनिर्देश खचित आढळला असता. हट्टी हा मूळ पट्टी ( पत्ती ) शब्द होय. तो यजुर्वेदातील रुद्राध्यायात आहे, असे सांगून जोशी यांनी त्यावर मोठीच इमारत रचली आहे. पत्ती म्हणजे मूळचे आर्येतर लोक म्हणजेच द्रविडी - हट्टी-लोक होत असे ते म्हणतात. मिराशी म्हणतात की रुद्राध्यायात, 'पत्तीनां पतये नमः ।' असे म्हटले आहे. पण रथपती, अश्वपती, सेनापती यांच्याबरोबरच पत्ती शब्द येतो. तेव्हा 'पादचारी योद्धा' असा सायणाचार्यांनी त्याचा केलेला अर्थच संदर्भाशी जास्त जुळता आहे. मधलाच एक शब्द तेवढा जनवाचक मानणे सयुक्तिक नाही. डेक्कन कॉलेज पुणे येथील डॉ. सांकलिया यांनीही महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती ही हट्टी किंवा पट्टी या शब्दापासून लावण्याचा जोशी यांचा प्रयत्न अयोग्य आहे, असेच मत दिले आहे (महाराष्ट्र संस्कृतीचा प्रारंभकाल - मौज, दिवाळी अंक १९५४). हेमाद्रीने झाडीमंडळ जिंकले, असा उल्लेख यादवांच्या शिलालेखात आहे. त्याचा अर्थ वऱ्हाड असा करून जोशी यांनी मरहट्ट हेच मूळ महाराष्ट्राचे नाव असे मत मांडले आहे. पण मिराशी म्हणतात, तेथे झाडीमंडळ याचा अर्थ वऱ्हाड असा करणे युक्त नाही. कारण वऱ्हाड हा हेमाद्रीच्या आधीच यादवांनी जिंकला होता असे अनेक शिलालेखांवरून दिसते.

व्युत्पत्तीची जादूगिरी
 ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे हे जोशी यांचे विधान असेच मनोरंजक आहे. ज्ञानेश्वरीत १२००० शब्द आहेत. त्यांतील सुमारे ४० शब्द कानडी आहेत.