पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
३४
 

एकही उपपती समंजस नाही. याचे कारण काय? तर त्यांतील एकाची व्युत्पत्ती दुसऱ्यास संमत नाही. डॉ. भांडारकर, डॉ. काणे, राजवाडे यांची मने परस्परविरोधी आहेत ! वरील पंडितांची मते परस्परविरोधी आहेत, एकाचे मत दुसऱ्यास संमत नाही. म्हणून त्यांतील एकही मत समंजस नाही, हे अजब तर्कशास्त्र आहे. त्याअन्वये कोणतेही मत असमंजस व त्याज्य ठरविता येईल. कारण ते कोणाला तरी अमान्य असतेच. जोशी यांची त्यांच्या या पुस्तकातील सर्वच मते या न्यायाने असमंजस ठरतील.
 वररुची हा व्याकरणकार इ. सनाच्या प्रारंभी होऊन गेला. त्याने महाराष्ट्री हे भाषेचे नाव दिलेले आहे. मरहट्टे लोकांची हीच महाराष्ट्री प्राकृत भाषा होय हे जोशी यांना मान्य आहे. पण भाषेला ते नाव कसे पडले, हा वाद आहे. कारण महाराष्ट्र हा शब्द वररुचीच्या पूर्वी सापडत नाही. शिवाय महाराष्ट्र हा जनवाचक शब्द नाही, देशवाचक आहे. प्राचीन काळी देशांना नावे पडत ती जनांवरून, लोकांवरून पडत. तेव्हा वररुचीच्या पूर्वी महाराष्ट्र देशाला लोकांवरून पडलेले दुसरे नाव असलेच पाहिजे. ते कोणते असावे ? तर मऱ्हाट, आणि ते मरहट्टे या लोकांवरून पडले. आणि हा शब्द कानडी आहे.

आधी महाराष्ट्र
 वररुचीच्या पूर्वी महाराष्ट्र हा शब्द कोणत्याही ग्रंथात आढळत नाही, म्हणून या देशाचे ते नाव होते, हे मत स्वीकारता येत नाही असे म्हणून जोशी 'मरहट्ट' हे नाव सुचवितात. तेव्हा हा शब्द वररुचीच्या पूर्वीच्या कोणत्या तरी ग्रंथात आहे असे दाखविण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावयास हवी होती, पण तसे त्यांनी दाखविलेले नाही. त्यांच्याच मते मरहट्ट शब्द प्रथम लीलावई या इ. स. ८०० च्या सुमारास झालेल्या काव्यात सापडतो. त्याच्या पूर्वीच्या लेखांत, ग्रंथांत 'महाराष्ट्र' हा शब्द निश्चित आढळतो हे त्यांनाही मान्य आहे. तरी 'मरहट्ट' शब्दच मूळचा व मागून त्याचे महाराष्ट्र हे संस्कृतीकरण झाले असा त्यांचा आग्रह आहे. या शब्दातील दोन्ही पदे मर व हट्ट ही कानडी आहेत, आणि हा शब्द इ. सनापूर्वी वररुचीपूर्वी रूढ असला पाहिजे, असे जोशी यांचे मत आहे. पण त्या काळी कानडी भाषाच अस्तित्वात नव्हती. कानडीतला पहिला शिलालेखच इ. स. ४५० च्या सुमाराचा आहे. त्या आधी फारतर शेदोनशे वर्षे ती भाषा बोलण्यात असणे शक्य आहे. इ. सनापूर्वी ती असणे तर शक्य नाही. तरी त्या काळी हे कानडी नाव वऱ्हाड प्रांताला व पर्यायाने महाराष्ट्राला पडले होते, असे जोशी म्हणतात.
 जनांवरून, लोकांवरूनच प्रदेशाला नाव पडते हा जोशी यांचा आग्रह अनैतिहासिक आहे. दक्षिणापथ, सिंध, पंजाब, अवंती ही नावे लोकांवरून पडलेली नाहीत. मल्लराष्ट्र, गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, यांचे एकीकरण होऊन जे मोठे राष्ट्र झाले ते महाराष्ट्र असे कोणी म्हणतात. पण 'मोठे' हा शब्द देशाची पहाणी, मोजमाप झाल्यावाचून