पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८९
खर्डा - अखेरचा विजय
 

प्रदेशाची काहीच भर पडली नाही की मराठ्यांना धनाची प्राप्ती झाली नाही. पैसा पाठवा, पैसा पाठवा, अशी मागणी महादजीच्या प्रत्येक पत्रात आहे. कारण रजपूत, मुस्लिम हे कोणी खंडण्या देत नव्हते. महादजीचा सर्व उद्योग आतबट्ट्याचाच होता. रजपूत, शीख यांशी सख्य केले असते, मागले सर्व विसरून त्यांना संभाळून घेतले असते, तर पैसाही उपलब्ध झाला असता आणि अयोध्येच्या वजिराला व इंग्रजांना नमवून काशी, प्रयाग ही क्षेत्रे जिंकण्याचे मराठयांचे मनोरथही सिद्धीस गेले असते. कारण रजपूत, जाट, शीख हे सर्व हिंदूच होते.

दक्षिणेतच कार्य
 मराठे नर्मदेच्यावर गेलेच नसते तर, त्यांचा झाला यापेक्षा दसपटीने उत्कर्ष झाला असता, असे मागे एकदोन वेळा म्हटले आहे. तोच विचार टिपूच्या बाबतीत मनात येतो. महादजी दक्षिणेत असता, उत्तरेत गेलाच नसता, दक्षिणेतच, किंवा फार तर माळव्यात, त्याने आपले कवायती कंपू तयार केले असते, तर टिपूला नमविण्यासाठी इंग्रजांची मदत घेण्याचे मराठ्यांना कारणच पडले नसते. किंबहुना मागे सांगितल्याप्रमाणे हैदरचा आणि मग टिपूचाही उदय म्हैसूर प्रांती झाला नसता. पण तसे काही न झाल्यामुळे हैदर व टिपू यांच्यामुळे मराठयांचे अतोनात नुकसान झाले. इंग्रजांविरुद्ध तह करताना, नानाने तुंगभद्रेपलीकडचा सगळा मुलूख हैदरला देऊन टाकला होता. पुढे सालबाईच्या तहाच्या वेळी, कसे नुकसान झाले, ते मागे सांगितलेच आहे. आणि इतके करून १७८४ साली इंग्रजांनी टिपूशी स्वतंत्र तह केलाच. आणि सालबाईच्या तहाला सर्वस्वी जबाबदार असलेल्या महादजीला तोंडघशी पाडले.

बलमहिमा
 टिपूच्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्याने हिंदूंचा व ब्राह्मणांचा अतोनात छळ केला. हजारो हिंदूंना बाटविले. थोरा-मोठ्यांच्या बायका जनानखान्यात घातल्या. पण मराठे, निजाम व इंग्रज यांनी त्याची कोंडी केली, व आता सर्वनाश होणार असे त्याला दिसू लागले, तेव्हा त्याने, जय मिळावा म्हणून ब्राह्मणांची अनुष्ठाने बसविली, अनेक पडकी देवळे बांधून दिली आणि शृंगेरीच्या शंकराचार्याच्या मठाला विपुल साह्य केले. शक्ती, बल, सामर्थ्य यांचा असा महिमा आहे. शीख, रजपूत व महादजी यांना उत्तरेत हेच साधले असते, याविषयी, यावरून, शंका राहात नाही.

महादजी छत्रपती ?
 उत्तरेच्या कारभारात महादजीला फार मोठे वैभव प्राप्त झाले. पण तेथे तो कधीच संतुष्ट नव्हता. हे लवकर संपवून दक्षिणेत जावयाचे असे चारपाच वर्षे सारखे त्याच्या मनात होते. नानाशी वैमनस्य, तुकोजी, अलीबहाद्दर यांची तेढ, पैशाची ओढ,