पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५९०
 

यामुळे तो अती त्रासून गेला होता. दक्षिणेत जाऊन तेथला कारभार हाती घ्यावा, असा त्याचा विचार होता. १७९२ साली तो दक्षिणेत आला, तेव्हा तेथली कामे अर्धवट टाकूनच आला होता. पेशवाईचा कारभार नानाऐवजी आपल्या हाती द्यावा अशी त्याने सवाई माधवरावाला विनंतीही केली होती. पण नानांनी मला पिल्लासारखे संभाळले आहे, त्यांना मला दुखविता येत नाही, असे पेशव्याने सांगितले. महादजीचा मोठेपणा हा की त्याने त्यामुळे चिडून जाऊन भलते उपद्व्यापक आरंभिले नाहीत. आपले सर्व कंपू घेऊन तो उत्तरेत जाऊन तेथली व्यवस्था हाती घेणार होता. पण दुर्दैवाने त्याला मृत्यूनेच गाठले. पण महादजीच्या संबंधात एक विचार पुनः पुन्हा मनात येतो. पेशव्यांचा कारभारी होण्याऐवजी तो स्वतःच पेशवा झाला असता, इतकेच नव्हे तर सर्वांना बाजूला सारून स्वतः छत्रपतीच झाला असता, तर मराठ्यांचा उत्कर्ष यापेक्षा अनेक पटींनी जास्त झाला असता. हे सर्व नारायणरावाच्या खुनानंतर लगेच व्हावयास हवे होते. म्हणजे सर्व व्यवस्थेसाठी दीर्घ अवधी मिळून मराठी राज्याची घडी त्याला बसविता आली असती.

मराठा वृत्ती
 महादजीने, डी वॉयनेच्या हाताखाली, कवायती पलटणी तयार केल्या, हे त्याचे फार मोठे कार्य होय, यात शंका नाही. त्यांच्याच बळावर त्याला उत्तर हिंदुस्थानात मोठमोठे विजय संपादिता आले. पण कवायती कंपू ही अशी वरून चिकटवून देण्याची गोष्ट नाही. त्यासाठी समाजाची सर्व मनोवृत्तीच बदलावी लागते. मराठी लष्कराचा व शिस्तीचा केव्हाच संबंध नव्हता. उत्तर काळात तर, बेबंद अव्यवस्थेला सीमाच राहिली नव्हती. आपापले पथक उभारून लष्करात कोणीही, केव्हाही येत असे आणि केव्हाही, ऐन लढाईत मुद्धा, निघून जात असे. बहुतेकांचा मुख्य डोळा लुटीवर असे. पुणे, नागपूर, दिल्ली या राजधान्याकडे सरदारांची लष्करे आली की महागाई तर होईच, पण ही बहुतेक शहरे, लष्करे लुटून फस्त करीत. आणि हा नियम होता. अपवाद नव्हता. हे सर्व नष्ट झाल्यावाचून कवायती कंपूना काही अर्थ नव्हता. कारण तेथे सर्वत्र एक हुकमत, जागा सोडून कोणी हुकमावाचून हलावयाचे नाही ही शिस्त, आक्रमण करणे, माघार घेणे, हे सर्व सेनापतीच्या आज्ञेने व्हावयाचे. महादजी जर छत्रपती झाला असता तर त्याला हे सर्व करता आले असते. निदान याचा पाया तरी घालता आला असता. पण तसा विचार त्याच्या स्वप्नातही नव्हता.

निजाम
 महादजीच्या दुःखद निधनानंतर एक वर्षाने खर्ड्याची लढाई झाली. लढाईचे मुख्य कारण म्हणजे अनेक वर्षात निजामाने चौथाई दिली नव्हती. बाकी जवळजवळ साडेतीन कोटींची निघत होती. दुसरे म्हणजे पेशवाईत आता जोम राहिला नाही,