पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५८८
 

सर्व महादजीला पाण्यात पाहात असत. कारण त्यांच्या हातातली सर्व सत्ता एका मराठ्याने घेतली होती ! मुस्लिम पातशाही बुडाली, सर्वत्र काफराचे राज्य झाले, अशी वैराची भावनाच त्यांच्या ठायी धुमसत होती. म्हणून हमदानी, इस्माइलबेग, नफजकुलीखान यांच्याशीही महादजीला सारखे लढावे लागले. स्वतः बादशहा तरी कोठे संतुष्ट होता ? तोही महादजीविरुद्ध कारस्थाने रचीत असे आणि शेवटी गुलाम कादर या नजीबखान रोहिल्याचे नातवाने, बादशहा शहा अलम याची जी विटंबना केली तीपासून महादजीला बादशहाला वाचविता आले नाहीच. गुलाम कादराने राजवाडा खणती लावून लुटला, जनानखान्यातील स्त्रियांची वाटेल ती विटंबना केली आणि बादशहाचे डोळे काढले. शेवटी महादजीने त्याला पकडून ठार मारले हे खरे. पण हे काही बादशहाचे संरक्षण नव्हे. त्याची विटंबना झाली ती झालीच.
 सर्वाधिकारप्राप्ती झाल्यानंतर महादजीने आणखी एक उद्योग सुरू केला. मोगल बादशहाचेसुद्धा जुने ऐतखाऊ सरंजामदार होते. ते बादशाहीच्या संरक्षणाचा काही उद्योग करीत नसत. अशांचे सरंजाम जप्त करण्याचे महादजीने ठरविले त्याबरोबर एखादी भुतावळ उठावी तसे झाले. हा उद्योग खरे पाहता स्तुत्य होता. पण एवढे सामर्थ्य महादजीच्या ठायी होते काय ? रजपूत विरुद्ध, शीख, जाट विरुद्ध, हे मुसलमान सरदार उठले, आणि पूर्वेकडे इंग्रजांचा वचक, अशा रीतीने सर्व हिंदुस्थान महादजीच्या विरुद्ध होता. त्याच्याच अनेक पत्रांत तसा उल्लेख आहे. एवढ्यांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य, केवळ महादजींच्याच नव्हे, तर सर्व मराठेशाहीच्या ठायी नव्हते.

याऐवजी
 तेव्हा हा उद्योग करण्याऐवजी, रजपूत, शीख, जाट, यांची एक बलशाली फळी उभी करण्याचा उद्योग जर महादजीने केला असता, तर सर्व इतिहासच बदलला असता. बादशहा ताब्यात आलाच असता, पण पूर्वेकडे घुसून बंगाल, बिहार, ओरिसा हा इंग्रजांनी बळकावलेला मुलखही सोडविता आला असता. दक्षिणेत असा उद्योग करावा, असे नाना फडणिसाला स्वतः महादजीनेच लिहिले होते. टिपूवर इंग्रज, निजाम व मराठे यांनी स्वारी केली व त्याला नरम केले. इंग्रजांचे साह्य घेतले हे महादजीला आवडले नाही. टिपूचे साह्य घेऊन इंग्रजांविरुद्ध फळी उभारली पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. या टिपूने नरगुंदकर भावे, किमूरकर देसाई यांचा निःपात करून त्यांच्या स्त्रिया आपल्या जनानखान्यात घातल्या होत्या. जवळजवळ एक लक्ष हिंदूंना बाटविले होते. अशा टिपूशीही सख्य करावे, असा महादजीचा नानाला आग्रह होता. कारण इंग्रज हाच खरा शत्रू, असे त्याचे मत होते. याच न्यायाने रजपूत, शीख, जाट, यांशी त्याने सख्य करावयास हवे होते. म्हणजे इंग्रजांना त्याला सहज उखडून काढता आले असते. त्याऐवजी वरील जमातींशीच तो लढत बसला. मुस्लिम सरदार, रोहिले हे तर शत्रू होतेच. यामुळे झाले काय की मराठी साम्राज्यात नव्या मुलखाची,